Thu, May 23, 2019 20:51
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › निवडणूक कामात हलगर्जी; मनपा लिपिक निलंबित

निवडणूक कामात हलगर्जी; मनपा लिपिक निलंबित

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:06AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल जकात विभागातील कनिष्ठ लिपिक अनंत जगताप यांना बुधवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी तसे आदेश दिले. याप्रकरणी सहायक आयुक्‍त गौतम भिसे यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्यांवर नागरिकांनी हरकती घेतल्या असून, त्याची प्रशासनाच्या वतीने पडताळणी सुरू आहे. यासंदर्भात  खेबुडकर यांनी बुधवारी बैठक बोलावली होती. संबंधितांना सूचनाही दिल्या होत्या. 

परंतु, लिपीक जगताप यांनी त्यांच्याकडील मतदार यादीचे कंट्रोल चार्ट सिस्टिम मॅनेजर यांच्याकडे वेळेत दिले नाहीत. त्यांच्या यादीत काही त्रुटी होत्या. त्यामुळे पाच मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती. 

या त्रुटी दूर करण्यासाठी सिस्टीम मॅनेजर यांनी जगताप यांना अनेकवेळा बोलावले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ते कार्यालयाकडे  फिरकले नाहीत. परिणामी मतदार यादीचे काम खोळंबले होते. त्यामुळे निवडणूक कामात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याबद्दल खेबुडकर यांनी जगताप यांना निलंबित केले. त्यांचे प्रमुख सहायक आयुक्‍त  भिसे यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भिसे यांनी जगताप यांच्याकडून वेळेत काम करून घेतले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.