Fri, Jul 19, 2019 19:53होमपेज › Sangli › शेतीत रासायनिक खते, औषधांचा वापर टाळा

शेतीत रासायनिक खते, औषधांचा वापर टाळा

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 7:54PMसांगली : प्रतिनिधी

शेतीमध्ये  उत्पन्न वाढवण्यासाठी  बेसुमार रासायनिक खते, घातक औषधांचा वापर सुरू आहे. विषयुक्त शेती देशासमोरील सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे शेतीत रासायनिक खते, औषधांचा वापर टाळा, असा सूर आज येथे नैसर्गिक आणि आरोग्यवर्धक शेती विषयक परिसंवादात उमटला. 

येथील नेमिनाथनगर कल्पद्रूम क्रीडांगणावर राष्ट्रसंत आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराजांच्या संयम स्वर्ण दीक्षा महोत्सवाला आज प्रारंभ झाला. त्यात पहिल्या सत्राचे उद्घाटन स्वागताध्यक्ष, माजी महापौर सुरेश पाटील यांच्याहस्ते झाले. आर्ट ऑफ लिव्हिंग सोलापूरचे रणजीत फुले, गुलबर्गातील गौआधारित समग्र ग्रामविकास केंद्राचे सुधींद्र देशपांडे, पंचगाव्य अनुसंधान केंद्राचे नितेश ओझा, बाहुबली विद्यापीठाचे बी. डी. माळी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. रणजीत फुले म्हणाले, विविध आजारांच्या रुग्णात गेल्या दहा वर्षांत वाढ झाली आहे. याचे  कारण रासायनिक शेती आहे. जर्सी गायीचे दूध मधुमेहाचे, प्युरिफाईड तेल हृदयविकाराचे, पांढरी साखर संधीवाताचे मूळ आहे. विषमुक्त भाजीपाला, घाण्यावरचे तेल, देशी गाईचे दूध हेच आरोग्यासाठी फायद्याचे आहे.  ओझा म्हणाले, देशी गाईचे दूध लहान मुलांतील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.  प्रत्येक शेतकर्‍याच्या दारात एक देशी गाय हवीच. बी. डी. माळी म्हणाले,  शेतीचे उत्पन्न थोडे कमी आले तरी चालेल, मात्र सेंद्रिय शेतीशिवाय गत्यंतर नाही.  सुधींद्र देशपांडे म्हणाले, रोगांची सुरवात पोटातून होते. विषमुक्त पदार्थ हाच आरोग्यमंत्र आहे.   सेंद्रिय शेतीसाठी प्रदीर्घ मोहीम राबवण्याची गरज सुरेश पाटील यांनी व्यक्त केली. 

आज आरोग्य तपासणी औषधोपचार शिबिर

महोत्सवात  उद्या (दि. 16)सामान्य आजार, पोषण अभाव, रक्तदाब, मधुमेह, पोटाचे विकार, कॅन्सर, मानसिक विकार, लाईफ स्टाईल मॅनेजमेंट, त्वचारोग, हार्मोन्स, दंत विकार, नेत्रविकार आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आणि माजी महापौर सुरेश पाटील यांनी सांगितले.