Wed, Jan 16, 2019 10:08होमपेज › Sangli › शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा इशारा

शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा इशारा

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 12:09AMइस्लामपूर : वार्ताहर

कृषी खात्याच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणारे हरितगृहातील रोपे व लागवड साहित्याकरिता अनुदान गेल्या 3-4 वर्षांपासून मिळाले नाही. हे अनुदान त्वरित न मिळाल्यास आत्मदहन करू, असा इशारा वाळवा तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिला आहे. 

याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी, तालुक कृषी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी खात्याच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत आम्ही हरितगृह, शेडनेट हाऊस प्रकल्प उभारणी केली आहे. याचे अनुदान आम्हाला मिळाले आहे. परंतु संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृहातील रोपे व लागवड साहित्याकरिता गेल्या 2-3 वर्षांपासून अनुदान मिळालेले नाही. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही या मागणीकडे कृषी विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. 

आधीच बदलते हवामान, रोगराईचा वाढता प्रादूर्भाव व फळ-भाजीपाला पिकाला नसलेला भाव यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत प्रकल्प उभारणीकरिता बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजही शेतकरी भरू शकत नाही. त्यामुळे शासनाने हे अनुदान वेळेवर द्यावे. इतर जिल्ह्यात ते मिळाले आहे. अनुदान न  मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी आत्मदहन करू, असा इशाराही देण्यात आला आहे. नंदकुमार चव्हाण, अशोक देसाई, संध्याराणी पाटील, जयमाला पाटील, विलास पाटील, श्रीकांत माने, मालन खोत, विजय जाधव, श्रीकांत पाटील आदींसह 23 शेतकर्‍यांनी हे निवेदन दिले आहे.