Sun, Feb 23, 2020 11:20होमपेज › Sangli › आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष

आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 7:55PMकराड : प्रतिनिधी 

गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीत खूप उलथापालथी झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँगे्रसकडून पक्ष बळकटीसाठी कठोर पावले उचलली जात असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत लाथाळ्यांचे दर्शन घडले आहे. त्यामुळेच आ. पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांबाबत कोणती भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बाळासाहेब पाटील यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पुनर्रचना करण्यासाठी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. विद्यार्थी संघटनेतील मरगळ दूर करण्यासाठी हे पाऊल उचलले असून लवकरच नवीन कार्यकारिणी निश्‍चित केली जाणार असल्याचेही राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. एकीकडे अशी स्थिती असतानाच आ. बाळासाहेब पाटील यांनी विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजन या माध्यमातून लोकांशी संवाद कायम ठेवला आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातूनही आ. पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसकडून शासनाच्या धोरणाविरूद्ध सातत्याने आवाज उठवला जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन एकसंघपणे पावले उचलली जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्ष बळकटीसाठी सकारात्मक पावले उचलली जात असताना राष्ट्रीय काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांचे दर्शन संपूर्ण जिल्ह्याला घडले आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून आ. जयकुमार गोरे समर्थक सोशल मिडियावर चांगलेच आक्रमक दिसतात. त्याचबरोबर पक्षात लोकशाही आहे ना ? असे प्रश्‍न उपस्थित करत आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हाध्यक्ष पदाबाबत बोलणे गैर नसल्याचेच मसूर येथील काँग्रेस मेळाव्यात बोलून दाखवले आहे. त्याचबरोबर आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांना यापुढेही ताकद देतच राहणार, असे ठणकावून सांगितले आहे.

धैर्यशिल कदम यांनीही आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आल्यानेच आपण गप्प बसलो असे सांगितले आहे. ‘खूप वाईट वाटले, खूप बोलायचे होते’ असे सांगत एकप्रकारे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कदम यांच्यासह भीमराव पाटील, निवासराव थोरात या जिल्हा परिषद सदस्यांसह सुदाम दिक्षीत, हिंदुराव चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी एकत्रितरित्या केलेले शक्तीप्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेससह काँगे्रस नेत्यांनाही आत्मचिंतन करायला लावणार होते. 

आ. आनंदराव पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी पत्रकारपरिषदेत मसूरच्या मेळाव्याला आपण जाणार नाही, असे पत्रकारांनी विचालेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले होते. मात्र त्यानंतरही धैर्यशिल कदम यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळेच आ. पृथ्वीराज चव्हाण कोणती भूमिका घेणार? मतभेद मिटवण्यात ते यशस्वी होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेस बैठकीला मुहूर्त 1 जुलैचा....

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून धैर्यशिल कदम यांना शांत बसण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळेच कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांकडून आ. आनंदराव पाटील यांच्याबाबत नमते धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळेच आ. चव्हाण सर्वांशी केव्हा चर्चा करणार? याबाबत उत्सुकता असतानाच ही बैठक 1 जुलैला होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, यास अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.