Wed, May 22, 2019 14:20होमपेज › Sangli › वसंतदादा कारखाना भाडेकरार दुरुस्तीकडे लक्षc

वसंतदादा कारखाना भाडेकरार दुरुस्तीकडे लक्ष

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:16AMसांगली : प्रतिनिधी

वसंतदादा कारखाना भाडेतत्वावर चालविण्याच्या कराराच्या दुरुस्तीकडे जिल्हा बँक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सोमवारपर्यंत करारातील काही त्रुटी दुरुस्त केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, श्री दत्त इंडियाने जमा केलेले 60 कोटी रुपये हे अनामत  रक्कम म्हणून न ठेवता कारखान्याच्या कर्ज खात्याला वर्ग करण्यास दत्त इंडियाने संमती द्यावी, अशी दुरुस्ती व्हावी यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ विशेष आग्रही आहे. 

भाडेकरारातील प्रमुख त्रुटींकडे काही संचालकांनी लक्ष वेधले आहे. दत्त इंडियाने कारखान्याच्या वतीने केलेल्या खर्चाची तसेच दिलेल्या देण्याची भरपाई करण्याची जबाबदारी बँक व कारखाना या दोघांवरही टाकलेली आहे. ते चुकीचे आहे. बँकेचा संबंध फक्‍त कर्ज वसुल करण्यापुरता आहे. दत्त इंडियाने केलेल्या इतर खर्चाला तसेच कारखान्याची इतर देणी फेडली असल्यास त्याची भरपाई दत्त इंडियाला द्यायला फक्‍त कारखानाच जबाबदार असला पाहिजे, असा पवित्रा बँकेच्या संचालकांनी घेतला आहे. 

.. तर बँकेची येणे वसुली अवघड?

भाडे करारानुसार जिल्हा बँकेची वसुली भाड्याच्या रकमेतून करायची आहे. मात्र, या भाड्यातून इतर रकमाही वसुल करण्याचा अधिकार दत्त इंडियाला दिला आहे. अशा परिस्थितीत बँकेचे येणे वसुल होणे कठीण आहे. दत्त इंडियाने कारखान्याच्यावतीने 40 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली आहे. या रकमेतून 2017-18 चे भाडे वसूल केल्यावरही 27.96 कोटी रुपये  बँक व कारखाना दत्त इंडियाला देणे लागतात, हा सारा प्रकार बँकेला अडचणीत आणणारा आहे. त्यामुळे करारातील त्रुटींची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही एका संचालकांनी सांगितले. 

वकिलांच्या सल्ला दुर्लक्षला!

भाडेकराराच्या मसुद्यात दुरुस्ती करण्यासंदर्भात बँकेच्या वकिलांनी सूचविले होते. मात्र, त्या दुरुस्ती केलेल्या नाहीत. दत्त इंडिया यांनी बँकेकडे बिनव्याजी 60 कोटी रुपये ठेव ठेवायची होती. मात्र, ही ठेव कर्जदार कारखान्याने परत देण्याबाबत चर्चा झाली होती. बँकेच्या वकिलांनी तसे स्पष्ट केले होते. वकिलांचा सल्ला का दुर्लक्षला, असा सवालही बँकेच्या एका संचालकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, भाडेकरारातील त्रुटी दुरुस्त करण्याचे ठरले आहे. त्रुटी दुरुस्त होणे बँकेच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे, असेही संचालकांनी सांगितले.