Wed, Nov 14, 2018 00:29होमपेज › Sangli › कामटेचा नातेवाईकांना भेटायचा प्रयत्न फसला

कामटेचा नातेवाईकांना भेटायचा प्रयत्न फसला

Published On: Dec 20 2017 1:43AM | Last Updated: Dec 20 2017 1:43AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक उदगाव (ता. शिरोळ) येथील बायपास रस्त्यावर थांबले होते. नातेवाईकांजवळ पोलिस गाडी आल्यानंतर गाडीचा वेगही कमी झाला; मात्र माध्यमांचे प्रतिनिधी आजूबाजूला असल्याचे पाहून पोलिस गाडी न थांबता सुसाट निघून गेली. त्यामुळे कामटेसह इतरांचा नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न फसला. 

दरम्यान, कामटेसह सहा संशयितांना दि. 1 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. आर. इंदलकर यांनी आज दिले. न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी कामटे असलेल्या पोलिस गाडीचा पाठलाग केला. अंकली टोल नाक्याजवळून गेलेल्या बायपास रस्त्याच्या शेजारी कामटेसह अन्य संशयितांचे नातेवाईक थांबले होते. काहीजण कारमध्ये तर सात ते आठजण मोटारसायकल घेऊन थांबले होते. पोलिस गाडी त्यांच्याजवळ आल्यानंतर गाडीचा वेग कमी झाला. मात्र माध्यमांचे प्रतिनिधी जवळपास असल्याचे पाहून पोलिस गाडी सुसाट वेगात निघून गेली.  

कोथळे खून प्रकरणातील संशयित युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना  न्यायालयात उभे करण्यात आले.  त्यांना 1 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.