Thu, Apr 25, 2019 13:35होमपेज › Sangli › नगरसेवक सूर्यवंशींसह साथीदारांकडूनच धमक्या; हल्ले

नगरसेवक सूर्यवंशींसह साथीदारांकडूनच धमक्या; हल्ले

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:22AMसांगली : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांच्या साथीदारांनीच पहिल्यांदा आमच्या घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या. सौ. गीता सुतार यांना घरात घुसून पती सुयोग सुतार यांना जिवंत ठेवणार नाही, अशी सूर्यवंशी यांच्यासह साथीदारांनी धमकी दिली, असा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार व सौ. गीता सुतार यांनी पत्रकार बैठकीत केला. 

याप्रकरणी आम्ही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास गेलो तर आमचे गुन्हे दाखल करून घेतले नाहीत. केवळ अदखलपात्र गुन्हे नोंद केले.  त्यानंतर जाब विचारल्यास गेल्यानंतर सहानुभूतीसाठी आमच्यावरच धमक्या, हल्ल्याचे गुन्हे दाखल करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. आमच्यावर व भाजपवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुंडगिरीचे आरोप केले. वास्तविक राष्ट्रवादी म्हणजेच गुंडांची फौज हे समीकरण जनतेला चांगलेच माहीत आहे. गुन्हेगारीवर त्यांनी बोलूच नये. दंगल घडविणारे माजी महापौर, कोकेक तस्कर, खंडणीबहाद्दर, तडीपार अशा सर्वच गुन्हेगारांना राष्ट्रवादीने पोसले आहे. त्यांच्या नेत्यांनी वाळव्याचा बिहार केला आहे, हेही जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांना आम्ही धमकावणे हा आरोप हास्यास्पद आहे.

सुतार म्हणाले, प्रभाग 17 मधून भाजपकडून सुयोग सुतार हे इच्छुक आहेत. त्यांना वाढता प्रतिसाद आहे. उलट दिग्विजय सूर्यवंशी यांनी काहीच विकास न केल्याने आता जनता त्यांना जाब विचारत आहे. यातून हतबल होऊन जाणीवपूर्वक सुयोग तापट स्वभावाचे असल्याने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. मी व सुयोग घरी नसताना सूर्यवंशी व त्यांचे साथीदार गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारी घरासमोर कारमधून आले. त्यांनी घरासमोर बिअरच्या बाटल्या फोडल्या, अर्वाच्च शिवीगाळ केली. घरात महिला, लहान मुले होती. आम्ही दुसर्‍या दिवशी आलो, त्यानंतर काही गुंडांनी पुन्हा तसा प्रकार केला. आम्ही त्यांचा पाठलाग केला. आमच्या आयाबहिणींवर हल्ला होत असेल तर बघत बसावे का? 

ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत सुयोग थोडक्या मतांनी  पराभूत झाले. पाच वर्षांत दिग्विजय यांनी काय दिवे लावले हे जनतेला माहित आहे. त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी कोट्यावधीची विकासकामे केली आहे. त्या भीतीतूनच सूर्यवंशी यांनी मटकावाल्यांना हाताशी धरून असे भ्याड हल्ले सुरू केले आहेत. आम्ही कायदेशीर पद्धतीनेच जावू. आम्ही पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांची नावे दिली आहेत. प्रसंगी पालकमंत्री सुभाष देशमुख, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना भेटू. कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन उभारू.