Thu, Apr 25, 2019 05:33होमपेज › Sangli › काँग्रेस पं.स. सदस्यावर हल्‍ला

काँग्रेस पं.स. सदस्यावर हल्‍ला

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:28PMजत : प्रतिनिधी

तालुक्यातील बनाळी येथील पंचायत समिती सदस्य व काँग्रेस नेते रवींद्र सावंत यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्‍ला केला. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. हल्ल्यात सावंत हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनेरी टोळीचा मनरेगा घोटाळा चव्हाट्यावर आणल्याने हा भ्याड हल्‍ला करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी केला आहे.

सावंत हे बनाळीचे माजी सरपंच, सोसायटी अध्यक्ष असून सध्या गावात त्यांचीच सत्ता आहे. सोमवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास बनाळी फाट्याकडून गावाकडे येत असताना सावंत यांची गाडी सुमारे पंचवीस जणांच्या टोळक्याने अडविली. त्यांच्यावर जोरदार हल्‍ला करण्यात आला. सावंत एकटेच असल्याने त्यांना प्रतिकार करता आला नाही.

हल्‍लेखोरांनी दगड, काठ्यांनी त्यांच्यावर हल्‍ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. मारहाणीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पलायन केले. रात्री उशिराने त्यांना उपचारासाठी सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे बनाळीतील पाटील-जगताप गटाचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. सावंत यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांनीच हल्‍ला केल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष बिराजदार यांनी तातडीने पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, रवींद्र सावंत यांनी बनाळी गटात पंचायत समिती, ग्रामपंचायतीत भाजपचा पराभव केला आहे. त्यांनीच मनरेगा घोटाळ्यावर पंचायत समिती सभागृहात जोरदार आवाज उठविला आहे. भाजपच्या सोनेरी टोळीचा सावंत यांनी पर्दाफाश केल्याने भाजपने त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर खुनी हल्‍ला केला आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवर आमदार व पंचायत समिती सभापती दबाव आणत आहेत. या सर्व घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून निपक्षपातीपणे चौकशी करावी, अन्यथा काँग्रेस न्यायासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही बिराजदार यांनी दिला.