Wed, Jul 24, 2019 14:08होमपेज › Sangli › केंद्र सरकारला उद्योगपतींचीच चिंता

केंद्र सरकारला उद्योगपतींचीच चिंता

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 12:39AMआटपाडी  ः प्रतिनिधी 

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा इगो असल्याने त्यांनी गेल्या साडेतीन वर्षांत पाठवलेल्या 30 पत्रांना उत्तरच दिलेले नाही, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे केली. केंद्र सरकारला अदानी-अंबानी अशा उद्योजकांचीच चिंता आहे, शेतकर्‍यांची नाही, अशी टीकाही त्यांनी केली. येथील बचतभवन मैदानाावर जनलोक आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी सायंकाळी आयोजित  जनजागृती सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर संयोजक कल्पना इनामदार, राळेगणसिध्दीचे सरपंच नागेश आवटी, वीरेंद्र राजमाने उपस्थित  होते.

हजारे म्हणाले, शेतीमालाला हमीभाव, लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, वृध्द शेतकर्‍यांना 5000 रुपये पेन्शन, पाणी समस्या मार्गी लावाव्यात, या मागण्यांसाठी  दिल्लीत  जनआंदोलन होणार आहे. त्याच्या तयारीसाठी देशातील 11 राज्यांत दौरा झाला. लोकांमधून  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळते आहे. ते म्हणाले, देशातील शेतीची  ‘माल खाये मदारी और नाच करे बंदर’ अशी परिस्थिती झाली आहे. शेतीमालाला खर्चापेक्षा दीडपट भाव मिळाला तरच शेतकरी उभा राहील.राज्याच्या कृषी मूल्य आयोगाने दिलेल्या अहवालात काटछाट करण्याचा अधिकार केंद्राला नाही.दराअभावी शेतीमाल रस्तावर फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे घामाला दाम मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

हजारे म्हणाले, शेतीला बँक कर्ज देत नाही. चक्रव्याढ पध्दतीने व्याज आकारले जात आहे. सन 1972 पासून घेतलेले हे व्याज परत देण्यासाठी प्रयत्न करू. हजारे म्हणाले, लोकपाल विधेयकाला कमकुवत करुन तीन दिवसात ते  मंजूर झाले. जनतेसाठी अत्यंत महत्वाचा असलेला कायदा मोदींनी लोकांच्या विश्‍वासाला तडा देत बनवला ही दुर्देवी बाब आहे.तो आम्हाला मान्य नाही.आमच्या मसुद्याप्रमाणे कायदा करावा याबाबत आम्ही ठाम आहोत.  ते म्हणाले,   दुष्क़ाळग्रस्त भागातील जनतेने राळेगणसिध्दीच्या धर्तीवर पाणी अडवून आपले जीवन समृध्द करावे. स्वतःच्या पायावर  उभे राहण्याचा प्रयत्न करावा.

सत्ता नाही तर व्यवस्था बदलण्याची गरज आहे आणि ती तुम्ही- आम्हीच बदलली पाहिजे.त्यादृष्टीने संघटित होउन लढा द्या. कल्पना इनामदार म्हणाल्या, दुष्काळी भागात अण्णांना आणायचे स्वप्न होते. मोठ्या संख्येने जमून अण्णांचे स्वप्न साकारण्यासाठी दिल्लीत होणार्‍या आंदोलनात सहभागी व्हा. नागेश आवटी म्हणाले, जनतेच्या हक्कासाठीचा अण्णांचा लढा म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई असल्याचे आहे. संभाजीराव देशमुख, व्ही.एन.देशमुख,आबा सागर यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाचा फायदा नाही हजारे म्हणाले, माझ्या आंदोलनाचा फायदा घेऊन काहीजण मुख्यमंत्री,राज्यपाल झाले.त्यामुळे आता आंदोलनात सहभागी होणार्‍यांना यापुढे  निवडणूक  लढवणार नाही  व कोणत्याही  राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही अशी लेखी हमी द्यावी लागेल. त्याशिवाय  आंदोलनात प्रवेश दिला जाणार नाही.