Tue, Mar 19, 2019 20:51होमपेज › Sangli › स्वतंत्रपूर खुल्या कारागृहाचा चेहरामोहरा बदलणार

स्वतंत्रपूर खुल्या कारागृहाचा चेहरामोहरा बदलणार

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 21 2018 12:28AMआटपाडी  ः प्रशांत भंडारे 

येथील स्वतंत्रपूर खुल्या कारागृहा (वसाहती)त बंद्यांच्या निवासस्थानासाठी 22 खोल्यांची इमारत मंजूर झाली आहे. या कामासाठी शासनाने अडीच कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निर्णयामुळे पडझड झालेल्या  या वसाहतीमध्ये नवीन इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डबघाईस आलेली इमारत पाडून नुतन इमारत उभारली जाणार आहे. त्यामुळे या वास्तूचा चेहरामोहरा बदलणार आहे.
अजाणतेपणी किंवा रागाच्या भरात घडलेल्या गुन्ह्यासाठी तसेच त्याबद्दल अपराधी असल्याची भावना असलेल्या आणि  चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांसाठी ही वसाहत आहे. त्यांना पुन्हा माणसात आणण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतंत्रपूरची निर्मिती झाली.   

महात्मा गांधीजींच्या विचाराचा प्रभाव पडलेल्या मॅारिस फ्रीडमन यांची ही मूळ संकल्पना होती. तत्कालीन औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले. सन 1937मध्ये या वसाहतीची उभारणी सुरू झाली.1939 मध्ये या मुक्त कैदी (खुले कारागृह) वसाहतीचा प्रारंभ झाला.या वसाहतीत कैदी कुटुंबियांसह राहतात. आजपर्यंत साडेतीनशेपेक्षा अधिक अधिक कैदी या वसाहतीतून शिक्षा भोगून बाहेर गेले आहेत. खुनाबद्दल जन्मठेप झालेले कैदी या वसाहतीत राहतात. त्यांना  बेड्या घातल्या जात नाहीत. वसाहतीचे क्षेत्र 30 हेक्टर 21 आर आहे. त्यापैकी बागायत 10 हेक्टर आणि जिरायत 2 हेक्टर 37 आर आहे.

सुमारे ऐंशी वर्षांपूर्वीच्या या वसाहतीमधील मोजक्याच खोल्या सुस्थितीत आहेत. बहुतांश खोल्या पडलेल्या आहेत. नवीन खोल्या बांधण्याबाबत अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आले होते.परंतु त्याला मान्यता मिळालेली नव्हती. सध्या या ठिकाणी तीन ते चारच कैदी आहेत. आमदार अनिल बाबर यांनी  नवीन  इमारतीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाबर यांनी भेट घेतली. स्वातंत्र्यपूर्व काळातील अमुल्य ठेवा जतन करण्याची गरज पटवून देत निधीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली.त्यामुळे या वसाहतीत बंदीनांसाठी नवीन इमारत उभारण्यासाठी निधी मिळाला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या इमारतीला नवसंजीवनी मिळणार आहे.

या खुल्या कारागृहाच्या संकल्पनेवर आधारित ‘दो अँाखे बारा हाथ’ या चित्रपटाने इतिहास निर्माण केला.  गुन्हेगाराला माणुसकीची शिकवण देत पुन्हा माणूस बनवण्याचा प्रयत्न करणारी ही शाळा सर्वांच्या समोर आली. आजही तो चित्रपट आणि त्यातील  ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ हे गीत लाखो रसिकांच्या  आठवणीत आहे.