Mon, Mar 25, 2019 05:10
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli ›

मंत्रालय झाले आत्महत्यालय : अजित पवार

मंत्रालय झाले आत्महत्यालय : अजित पवार

Published On: Apr 05 2018 2:11AM | Last Updated: Apr 05 2018 1:24AMआटपाडी ; प्रतिनिधी 

निष्क्रिय सरकारमुळे जनतेवर आत्महत्या करण्याची वेळ आली असून मंत्रालय ‘आत्महत्यालय’ झाले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या आमदार पत्नीला भाजप सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेसाठी आंदोलन करावे लागते ही मोठी शोकांतिका असल्याची घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्ह्यातील प्रारंभाची मोठी जाहीर सभा येथे झाली. त्यावेळी पवार बोलत होते. आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, अण्णासाहेब डांगे, विलासराव शिंदे, दिलीप पाटील, चित्रा वाघ, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, हणमंतराव देशमुख,  भारत पाटील, आनंदराव पाटील, रावसाहेब पाटील, सादिक खाटीकउपस्थित होते.

पवार म्हणाले, भाजप सरकारच्या निर्णयामुळे समाजातील कोणताच घटक समाधानी नाही. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली नाही. शेतीमालाला दराची हमी नाही. शहरी भागातील मंत्र्यांना जनतेचे भले कळत नाही. हे सरकार फक्त घोटाळेबाजांचे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रावर या सरकारने सर्वाधिक अन्याय केल्याचा आणि शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्याचा आरोप केला. सुनील तटकरे म्हणाले, खोटे बोला, पण रेटून बोला एवढेच काम सरकार करत आहे. नवीन रोजगार निर्मिती करण्याऐवजी रोजगार्‍यांनाच  बेरोजगार करण्याचे काम सुरू आहे.घोटाळेबाज सरकारला उलथवून टाकण्यासाठी खानापूर - आटपाडीचा आमदार राष्ट्रवादीचा करण्याचे त्यांनी आवाहन केले.

 जयंत पाटील म्हणाले, भाजप-सेनेच्या नादाला लागले, की काय होते हे जनतेने अनुभवले आहे. सरकारचे अपयश मांडण्यासाठी हल्लाबोल सुरू केल्याचे स्पष्ट करीत आगामी काळात जनता ही चूक दुरुस्त करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अण्णासाहेब डांगे म्हणाले,  भाजप सरकार धनगर समाजाला आरक्षण देणार नाही.   समाजबांधवांनी या डावाला बळी पडू नये. हणमंतराव देशमुख यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, राष्ट्रवादीतून अन्य पक्षात गेलेल्या एका नेत्याने आर. आर. पाटील यांचा आधार घेत जनतेला त्रास दिला तर दुसर्‍याने निवडणुकीपूर्वी पक्ष बदलला. मात्र अशाही परिस्थितीत पक्ष टिकविला आहे. आता पक्षाने ताकद दिल्यास तालुका राष्ट्रवादीमय करण्याची ग्वाही देत तालुक्याचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. 
 

 

 

 

tags ; Atpad,news,Ministry ,Suicide,NCP, Sangli ,district, public, meeting,