Sat, Aug 24, 2019 22:20होमपेज › Sangli › मनपातील लुटारूंना शेवटचा धक्का द्या : खा.पूनम महाजन

मनपातील लुटारूंना शेवटचा धक्का द्या : खा.पूनम महाजन

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 12:26AMसांगली  : प्रतिनिधी

वर्षानुवर्षे ‘स्टँडिंग-फंडिंग’च्या माध्यमातून टक्केवारीचा डल्ला मारत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लुटारूंनी महापालिकेला लुटले. कोट्यवधी रुपये येऊनही शहराचे वाटोळेच केले. त्यामुळे अशा लुटारूंना येत्या जूनमध्ये होणार्‍या मनपा निवडणुकीत शेवटचा धक्का द्या, असे आवाहन भाजप युवामोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले. येथील स्टेशन चौकात भाजप युवा मोर्चा परिषदेत त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, भगवानराव साळुंखे, शेखर इनामदार, दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, आमदार राजू तोडसम, शरद नलावडे, मुन्ना कुरणे उपस्थित होते. महाजन म्हणाल्या, गेल्या 15 वर्षाहून अधिककाळ देश आणि राज्याच्या सत्तेची चावी असणार्‍या हात आणि घड्याळाने जनतेच्या कररूपी तिजोरीवर दरोड्याचा एककलमीच कार्यक्रम राबविला. त्यामुळे जनतेने चांगला पर्याय म्हणून भाजपला संधी दिली. भाजप आज कामांच्या जोरावर देशभरात मोठासत्ताधारी  पक्ष बनला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वजण फक्‍त सामान्य जनतेचा विकास हेच ध्येय ठेवून योजना राबवत आहेत. सांगली जिल्ह्याला हजारो कोटी रुपये पाणी योजनेसह विविध कामांसाठी दिले. त्या म्हणाल्या, मेक इन इंडिया, स्टार्टअप्, मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून लाखो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. पण वर्षानुवर्षे लुटणारे आज आम्हाला जाब विचारत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीने शहराला खड्ड्यांत घातले होते. मात्र आमदार गाडगीळ आणि खाडे यांनी शासनाकडून 60 कोटी रुपये आणले. त्यातून शहर खड्डेमुक्‍त झाले आहे. एवढे पैसे कधीच आले नव्हते. पूर्वी 30 कोटी रुपयांच्या कामात 15 कोटी हाणले जात होते. अन्य ठेकेदार, कार्यकर्त्यांना आणि उरले तर 5 कोटी रुपयांत विकासकामे असला उद्योग होता. 

टिळेकर म्हणाले, सांगलीचा खासदार भाजपचा करून जसा इतिहास घडवला, तसाच आगामी निवडणुकीत भाजपचा महापौर करून सांगलीकर इतिहास घडवतील.
युवामोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर म्हणाले, पुरोगामीत्वाचा टेंभा मिरविणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीने जाती-पातीचे राजकारण करून राज्य केले. त्यांनी जिल्हा आणि राज्याला काय दिले? खाडे यांनी मिरजेच्या दर्ग्यासाठी तीन कोटी रुपये आणले. काँग्रेस-राष्ट्रवादीने काहीच दिले नव्हते. जिल्ह्यात आणि राज्यात सर्वाधिक निधी तीन वर्षांत भाजपने आणला आहे. शहर जिल्हाध्यक्ष जयगोंड पाटील यांनी आभार  मानले.

इंजिन घड्याळावर... राजकीय चिखलात कमळच गोपीचंद पडळकर यांनी स्टेशन चौकात स्व. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंपासून अनेकांच्या सभांचा इतिहास मांडला. त्याच पद्धतीने आजच्या सभेद्वारे इतिहास घडेल, असे त्यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची कविता सादर केली. तोच धागा पकडून महाजन यांनीही कवितेतूनच टोलेबाजी केली. त्या म्हणाल्या, आजकाल इंजिन घड्याळाच्या इशार्‍याने चाललंय, हात कोणी दाखवतंय.. धनुष्यबाण कोठे चालला आहे, कोणाकोणाचा मधुचंद्र चालला आहे....पण या सर्व राजकारणाच्या चिखलात कमळ जोरात उमलतंय.