Mon, Mar 25, 2019 00:02
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › ‘रोहयो’तील १०८५ सिंचन विहिरींची कामे अपूर्ण

‘रोहयो’तील १०८५ सिंचन विहिरींची कामे अपूर्ण

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 06 2018 10:38PMसांगली : प्रतिनिधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र (मनरेगा) अंतर्गत सन 2012-13 ते 2017-18 अखेर 1085 सिंचन विहिरींचे काम अपूर्ण आहे. या विहिरींचे काम पूर्ण करण्यासंदर्भात ‘रोहयो’ सचिवांनी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी विहिरींच्या पूर्णत्वासाठी विशेष मोहीम आखली आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ उपस्थित होते. 

‘मनरेगा’मधून अल्पभूधारक शेतकर्‍यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जातो. एका विहिरीसाठी 3 लाखांपर्यंत रक्कम उपलब्ध होते. जिल्ह्यात 5 हजार 336 सिंचन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी 3 हजार 917 विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. आजअखेर 1085 विहिरी अपूर्ण आहेत. 334 विहिरी मंजूर आहेत, पण त्या सुरूच झालेल्या नाहीत. 

अपूर्ण विहिरींमुळे संबंधित गावात नवीन लाभार्थींना विहीर मंजूर करण्यात अडचणी येत आहेत. पात्र लाभार्थी सिंचन विहिरीच्या लाभापासून वंचित राहत आहेत. शिवाय गेली काही वर्षे विहिरींचे काम रखडले असल्याने रोहयो सचिवांनी गंभीर दखल घेतली आहे. अपूर्ण विहिरींपैकी 14 विहिरींवर तीन वर्षात काहीच खर्च झालेला नाही. गेल्या दोन वर्षात 30 विहिरींवर आणि वर्षात 11 विहिरींवर एक पैही खर्च झालेला नाही. एप्रिल महिन्यात 500 विहिरींचे, तर जूनअखेर उर्वरीत सर्व विहिरींचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट निश्‍चित केले आहे. 

ठप्प 598 विहिरींची कारणे...!

अपुरा निधी प्राप्त : 89 
लाभार्थी काम करण्यास उत्सुक नाही : 254
तक्रार/वाद/एफआयआरमुळे काम बंद : 43
नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ट गावातील अपूर्ण विहीरी : 4
ब्लास्टिंग परवानगी अथवा ब्लास्टिंग युनिट अप्राप्तमुळे : 75
2012 पूर्वी मंजूर व त्यानंतर निधी वाढ झाल्याने अपूर्ण ठेवलेल्या विहिरी: 133

 

Tags : sangli, sangli news, MGNREGA, irrigation wells, incomplete,