Sat, Mar 23, 2019 12:20होमपेज › Sangli › ग्रहण म्हणजे केवळ सावल्यांचा खेळ

ग्रहण म्हणजे केवळ सावल्यांचा खेळ

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 8:32PMसांगली : प्रतिनिधी

सार्‍या अवकाशातच रोज ऊन-सावलीचा खेळ सुरू असतो. आता आपल्याकडे दिवस आहे तर अमेरिकेत रात्र आहे. म्हणजे आपली सावली अमेरिकेत पडली आहे. मग आपल्या सावलीचा त्रास अमेरिकेतील माणसांना का होत नाही. ग्रहणाचेही तसेच आहे. सूर्य आणि चंद्राच्यामध्ये पृथ्वी आल्याने तिची सावली चंद्रावर पडते. त्यालाच चंद्रग्रहण म्हणतात. म्हणजेच ग्रहण हा केवळ सावल्यांचा खेळ आहे, असे प्रतिपादन खगोलशास्त्रज्ञ डॉ. आनंद घैसासी यांनी केले. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली शाखेतर्फे आयोजित ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण’ या जनप्रबोधन मोहिमेअंतर्गत ‘प्रश्‍न तुमचे उत्तर आमचे’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले,  अवकाशातील ग्रह, तार्‍यांवर पडणार्‍या सावल्यांना घाबरून ग्रहण पाळणे शहाणपणाचे आहे का, असा प्रश्‍न त्यांनी  केला.  आपण रोजच पृथ्वीच्या सावलीतून जातो. मग आपल्यावर त्याचा परिणाम का होत नाही, असेही ते म्हणाले. 

खरेतर अवकाशात घडणार्‍या ग्रहणांमुळे संबंधित ग्रह, तार्‍याभोवती असणारे ग्रह, लघुग्रह आपणाला दिसतात. अशा ग्रहणांची खगोलशास्त्रज्ञ वाटच पाहत असतात.  भारतात अनेक ठिकाणी गरोदर स्त्रियांना ग्रहणाचे वेध पाळणे बंधनकारक केले जाते.  मात्र यामुळे गर्भाला धोका निर्माण होऊ शकतो. ग्रहणामुळे गर्भावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असेही डॉ. घैसासी यांनी सांगितले. 

ग्रहण पाळल्यामुळे अनेकदा गरोदर स्त्रियांना गर्भासह प्राणाला मुकावे लागल्याची उदाहरणे आहेत. नांद्रे, हरिपूर येथे अंनिसतर्फे याबाबत प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक स्त्रियांनी ग्रहण न पाळण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. प. रा. आर्डे यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी डॉ. नितीन शिंदे, संजय अष्टेकर, शंकर शेलार, डॉ. नरेंद्र माळी यांचा सत्कार करण्यात आला. अंनिसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वंजाळे यांनी स्वागत केले. प्रा. प. रा. आर्डे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सचिव आशा धनाले यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी अ‍ॅड. के. डी. शिंदे, डॉ. महावीर अक्कोळे, संजय बनसोडे, त्रिशला शहा, प्रवीण कोकरे, आण्णा गेजगे आदी उपस्थित होते. राहुल थोरात यांनी आभार मानले.