Mon, Aug 19, 2019 05:49होमपेज › Sangli › स्वच्छता मोहिमेसाठी आष्टा सज्ज 

स्वच्छता मोहिमेसाठी आष्टा सज्ज 

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:32PMआष्टा : प्रतिनिधी

शहरात ‘ स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 ’ या स्वच्छता मोहमे अंतर्गत दि.24 ते 31 जानेवारी या कालावधीत स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 24 रोजी संपूर्ण शहरात एकाचवेळी श्रमदानाने  या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे.ही माहिती नगराध्यक्षा स्नेहा माळी व मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्याधिकारी निकम म्हणाले, ‘ स्वच्छ आष्टा , सुंदर आष्टा ’ या ध्येयाने  आष्टा शहर प्रेरित झाले आहे. संपूर्ण शहरात लोकसहभागातून हे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या अभियानासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वच्छ शहर सर्व्हेक्षण समितीत शहरातील सर्व प्रमुख व्यक्ती व संस्थांना सहभागी करण्यात आले आहे.वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग घेऊन शहरात जनजागृतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.प्रत्येक घर व व्यवसायाच्या ठिकाणचा ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी दोन वेगवेगळ्या रंगाच्या बकेटचे वाटप करण्यात आले आहे. घंटागाडीमार्फत कचरा गोळा करण्यात येत आहे.

शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी स्वच्छता रॅली काढून जनजागृती केली. परिसर स्वच्छ ठेवून या अभियानाला हातभार लावला.स्वच्छता  अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारी 24 तासांच्या आत सोडविल्या जात आहेत.शहरातील सर्व शाळा,दवाखाने व हॉटेल्सची स्वच्छतेच्या निकषानुसार तपासणी करण्यात आली आहे.घरोघरी कचरा वर्गीकरणाचे पोस्टर लावण्यात आले आहे.  गावात भिंतीवर स्वच्छतेचे संदेश लिहिण्यात येणार आहेत.

व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्येक 500 मीटर अंतरावर ओल्या व सुक्या कचर्‍यासाठी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.इलेक्ट्रॉनिक वेस्टच्या विल्हेवाटीसाठी पालिका ‘ ई वेस्ट फ्री आष्टा ’ ही मोहीम राबविणार आहेे.तसेच प्लास्टिक रस्त्यासाठी वापरण्याचा पालिकेचा विचार आहे.

नगरपरिषदेच्या सेंद्रिय खत प्रकल्पातून तयार होणारे उत्तम प्रतिचे खत शेतकर्‍यांना दोन रूपये किलो दराने उपलब्ध करून देण्यात येणार  आहे. दि.26 जानेवारी रोजी खत विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात येणार आहे.नगरपालिका फिल्टर हाऊस जवळील मोकळ्या जागेत सेंद्रिय खत वापरून तयार केलेला भाजीपाला   विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.