Tue, Apr 23, 2019 13:44होमपेज › Sangli › महाडिक यांचा पैरा कोण फेडणार?

महाडिक यांचा पैरा कोण फेडणार?

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 1:34AMइस्लामपूर : अशोक शिंदे

शिराळा विधानसभा मतदारसंघासह वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये नेहमी इतरांना पाठिंबा दिलेल्या नानासाहेब महाडिक यांचा पैरा आता कोण फेडणार, याविषयी वाळवा तालुक्यातील ‘त्या’ 48 गावांमध्ये औत्सुक्याचा विषय आहे. अर्थात इतरांना पाठिंबा देण्यापेक्षा  एकदा महाडिक कुटुंबाने रिंगणात उतरावेच, असाही समर्थकांत सूर आहे. वाळवा-शिराळा तालुक्यात इस्लामपूर व शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. दोन्हीही विधानसभा मतदारसंघांची मतदार संख्या 2.25 लाखांच्या पुढे आहे. वाळवा तालुक्यातील 48 गावे ,की जी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात नाहीत, ती 48 गावे शिराळा विधानसभा मतदारसंघात येतात. या गावांची मतदारसंख्या शिराळा तालुक्यापेक्षा अधिक म्हणजे 1 लाखापुढे आहे. या परिसरातील पेठ-रेठरेधरण व येलूर परिसरातील दोन्हीही जिल्हापरिषद मतदारसंघांवर नानासाहेब महाडिक व त्यांचे सुपुत्र पं. स. सदस्य राहुल महाडिक, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांचे वर्चस्व आहे. 

महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून सम्राट महाडिक यांनी दोन्हीही तालुक्यांत नेटवर्क वाढविले आहे. याआधी शिराळा मतदारसंघात माजी आमदार मानसिंगराव नाईक, विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांना निवडून आणण्यामध्ये वाळवा तालुक्यातून महाडिक गटाचा ‘हात’ मोलाचा ठरला आहे. शिराळा तालुक्यात आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँगे्रस युवा नेते सत्यजित देशमुख यांना मानणारे तीन स्वतंत्र प्रवाह आहेत. जिकडे दोघे तिकडे विजय, असाही काही काळ निघून गेला. आता आधीच्या ‘तिरंगी’ ऐवजी ‘चौरंगी’ लढतीविषयीही चर्चा सुरू झाली.  राज्यातील विविध पक्षांच्या आघाड्या व युती कशा होतात, त्याचेही पडसाद येथे उमटणार आहेत. अर्थात महाडिक गट या पलिकडचे राजकारण खेळण्यात तरबेज असून स्वतंत्र अस्तित्व ठेवून जि.प. निवडणुकीत स्वत:ची ताकद त्यांनी दाखवून दिली आहे. 

युवा शक्तीचे संघटन, शिराळा येथील नोकरी मेळावा, गावोगावच्या शाखा, वैयक्तिक व सामाजिक कामांना ‘फॉरमॅलिटी’ न पाहता दिलेली मदत, व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्था व इतर संस्थांचे नेटवर्क; अशा बळावर महाडिक  गट वाढत आहे. वाळवा पंचायत समितीत विकास आघाडीचे गटनेते म्हणून राहुल महाडिक प्रभावी ठरत आहेत. इस्लामपूर पालिकेत सत्तांतर होतानादेखील हा गट सक्रिय होता. राज्यातील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी सलगी असल्याने पेठनाक्यावर ‘चांदीची तलवार’ देणार्‍या महाडिक यांना निवडणुकांत मात्र कधी संधी मिळाली नाही. त्यामुळे  आता या कुटुंबातील दोन्ही युवा नेते सक्रिय झाले आहेत. या परिसरात लग्‍नसराईसह ठिकठिकाणच्या कार्यक्रमांना महाडिक गटाची हजेरी दिसत आहे. सम्राट महाडिक यांना भाजपने तिकीट नाकारले तर स्वाभिमानीची उमेदवारी देऊ, असे आ. नितेश राणे यांनी नुकतेच जाहीर करून इरादा स्पष्ट केला आहे.  आता पूर्वीप्रमाणे इतरांना पाठिंबा देऊन ‘आमदार’ करण्यात पुढाकार घेण्यापेक्षा जनतेपुढे उमेदवार म्हणून जाण्याच्यादृष्टीने हा गट तयारी करीत आहे.