Tue, Nov 20, 2018 04:14होमपेज › Sangli › दहा हजारांची लाच मागितली; पोलिस शिपायाला अटक

दहा हजारांची लाच मागितली; पोलिस शिपायाला अटक

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 11:11PMसांगली : प्रतिनिधी

वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवायचा नाही. तसेच गुन्हा दाखल करायचा नाही यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एका पोलिस शिपायाला अटक करण्यात आली. अझरुद्दीन महमद सलीम पिरजादे असे त्याचे नाव आहे. सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सांगलीत ही कारवाई केली. 

पिरजादे सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखेत कार्यरत आहे. तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा ट्रक आहे. तो रीतसर रॉयल्टी भरून अर्धनारी (मंगळवेढा) ते सांगली मार्गावर वाळू वाहतूक करतो, असे त्याचे म्हणणे आहे.  दि. 28 मे रोजी पिरजादे याने कर्नाळ (ता. मिरज) येथे तक्रारदाराचा वाळू भरलेला ट्रक अडवला. त्यानंतर ट्रकचालकाला त्याने दमदाटी केली. त्यानंतर ट्रक चालकाने मालकाशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यावेळी पिरजादे मालकाशी फोनवर बोलला. त्याने ‘तुझा ट्रक ओव्हरलोड आहे. तुझी गाडी सोडतो’, असे म्हणून त्याच्याकडे एक लाखांची मागणी केली. तडजोडीअंती त्याच्याकडून तीस हजार रूपये स्विकारले. नंतर भविष्यात ट्रक अडवायचा नाही तसेच गुन्हा दाखल करायचा नाही यासाठी त्याच्याकडे दहा हजारांच्या लाचेची मागणी केली. 

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता पिरजादे याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी सातारा येथील पथकाने पिरजादे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अधिक तपास उपअधीक्षक राजेंद्र तेंडूलकर करीत आहेत.