Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › आष्टा पालिकेत मुख्याधिकारी कार्यालयाची प्रचंड तोडफोड

आष्टा पालिकेत मुख्याधिकारी कार्यालयाची प्रचंड तोडफोड

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 11:14PM

बुकमार्क करा
आष्टा : प्रतिनिधी

येथील मटण मार्केट चौकात महिला व पुरुषांसाठी शौचालय बांधावे, या मागणीचे निवेदन देण्यासाठी आलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी हजर नसल्याने त्यांच्या टेबलवर खुर्ची व चपला ठेवल्या. कार्यालयातील संगणक व टेलिफोनची तोडफोड केली. पालिका कर्मचार्‍यांच्या तक्रारीवरून आष्टा पोलिसांनी अनुप अरुण वाडेकर याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ कर्मचार्‍यांनी काम बंद करून पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.  नगरपालिकेसमोर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मटण मार्केट चौकातील शौचालय पाडण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन घेऊन अनुप वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज काही नागरिक पालिकेत आले होते. मुख्याधिकारी हेमंत निकम हे प्रांत कार्यालयात घरकूल प्रकरणाच्या सुनावणीसाठी गेले होते. 

विरोधी गटनेते वीर कुदळे यांनी निवेदनाची मागणी केली. परंतु, निवेदन स्वीकारण्यास मुख्याधिकारी नसल्याने  कार्यकर्त्यांनी कर्मचार्‍यांना शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. मुख्याधिकार्‍यांच्या केबिनमध्ये घुसून खुर्ची व टेबलवर चपला ठेवल्या. यानंतर संतोष खराडे या कर्मचार्‍याकडे निवेदन देऊन तेथून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच सर्व कर्मचारी मुख्याधिकार्‍यांच्या केबिनमध्ये जमा झाले. घटनेची  माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील व पोलिस उपनिरीक्षक  श्रीनिवास सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी करून आंदोलकांना ताब्यात घेतले.

आंदोलकाविरूध्द आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.तसेच या घटनेच्या निषेधार्थ काम बंद करून कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.  नगरसेवक अर्जुन माने व शेरनवाब देवळे यांनी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.  वीर कुदळे म्हणाले, मुख्याधिकारी वेळोवेळी गैरहजर असल्याने नागरिकांचा याप्रकारे उद्रेक होत आहे.आष्टा पालिका ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे.  ही कंपनी चालविणार्‍या सोनेरी टोळीचा अस्त जवळ आला आहे.