होमपेज › Sangli › इंग्रजांप्रमाणे भाजपला हाकला

इंग्रजांप्रमाणे भाजपला हाकला

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 11:36PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यसेनानींनी जसे इंग्रजांना हाकलून लावले, त्याप्रमाणे भाजप सरकारला पिटाळून लावण्याची वेळ आली आहे. लोकशाही मार्गाने चले जावचा नारा देऊन या सरकारला सत्तेतून हाकलून द्या,  असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण यांनी केले.

कडेगाव येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, आमदार जयकुमार गोरे, आमदार अमर काळे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुताई टोकस, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील उपस्थित होते.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. माध्यमांची गळचेपी सुरू आहे. संपादक आणि पत्रकारांवर, चॅनेलवर दबाव आणला जात आहे. सरकारने सामान्य जनतेचे व शेतकर्‍यांचे जगणे कठीण  केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती रोज वाढत आहेत. जनता महागाईच्या वणव्यात होरपळत आहे. भाजप सरकारने गेल्या चार वर्षांत भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांशिवाय काहीच केले नाही. सामान्य माणसाला भवितव्याची चिंता निर्माण झाली आहे.  उद्योगात कायम अग्रेसर राहिलेल्या महाराष्ट्राची अधोगती झाली आहे.मागील चार  वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पुर्णपणे ढासळली आहे.यामुळे राज्यात सरकार नावाची गोष्ट शिल्लक  आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे .समाजातला कोणताच घटक या निष्क्रिय सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही .असे अशोक चव्हाण म्हणाले .

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.केंद्र व राज्यातील सरकारने निवडणुच्या काळात अनेक खोटी आश्वासने दिली.देशांतील सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या राज्यात झाल्या आहेत.कृषीच्या विकास दरात घट झाली आहे.महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य व गरिबांचे    जगणे मुश्किल झाले आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी,भ्रष्टाचार मुक्ती, अच्छे दिन आदी अनेक घोषणा करुन लोकांची दिशाभूल केली आहे.2 कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असे सांगितले.प्रत्यक्षात मात्र काही केले नाही तर जीएसटी नोटबंदी केल्याने देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. मोदी हे हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत.ते सत्तेवर राहिले तर संविधान शिल्लक राहणार नाही.सनातनवर बंदी घाला अशी मागणी होत असताना आहेत.चार चार लोकांचे खून होत आहेत.पलूस-कडेगावात डॉ. पतंगराव कदम साहेबांनी विकास कामाचा डोंगर उभा केला आहे.त्यामुळे येथे विश्वजित कदम यांना काही अडचण नाही.परंतु राज्यात सत्तांतर होणे गरजेचे आहे.त्यासाठी देशांतील व राज्यातील सरकार उलथवून टाकले पाहिजे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले ,जनसंघर्षाच्या माध्यमातून सामान्य माणूस रस्त्यावर आला आहे.या राज्यातील शेतकरी असुरक्षित आहे. मराठा ,मुस्लिम ,धनगर व अन्य समाजाच्या आरक्षण मागतोय .संपूर्ण राज्यात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे.हे आंधळे सरकार उध्वस्त करण्याची वेळ आली आहे.गोरगरीब व सामान्य जनतेच्या ताकतीने राज्यात परिवर्तन होणारच असे ते म्हणाले ,

यावेळी बोलताना आमदार डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, भाजपा सरकारने गेल्या साडे चार वर्षात लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे. देशातील व राज्यातील भाजपच्या अनेक मंत्री व आमदारांच्यावर भ्रष्ट्राचार व महिलांचे गुन्हे दाखल असताना ही मंडळी निर्लज्ज पणे सत्तेला चिकटून बसले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. या शासनाला निवडणुकी पूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. . नोटाबंदीने या शासनाने सामान्य नागरिकांना वेठीस धरले. केवळ भीतीपोटी आषाढी एकादशीला न गेलेल्या मुख्यमंत्री यांनी त्याचे खापर मराठा समाजावर फोडण्याचे मोठे पाप केले आहे. जाती - धर्मात विष पेरण्याचे काम हे शासन करत असल्याचे ते म्हणाले, परंतु आता सर्वसामान्य लोकांचे शोषण करणार्‍या शासनाच्या विरोधात सामान्य लोकांनी जनसंघर्ष केला आहे. या भागाच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी रात्रीचा दिवस करेन पण या लोकांना काही कमी पडून देणार नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी आमदार सतेज पाटील  यांनी मनोगत व्यक्त केले .स्वागत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले तर आभार सुनील जगदाळे यांनी मानले.