Tue, Apr 23, 2019 20:17होमपेज › Sangli › मराठा-ओबीसीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव

मराठा-ओबीसीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 11:08PMजतः प्रतिनिधी  

भाजपच्या भूलथापांना जनता कंटाळली असून, मराठा समाजाला ओबीसी समाजापासून तोडण्याचे काम भाजप करत आहे. आम्ही मराठा, मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला चालू करता येत नाही, असा आरोप  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा रविवारी जतमध्ये दाखल झाली.  यावेळी माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, महिला आघाडीच्या चारूताई टोकस, आ. मोहनराव कदम, आमदार डॉ. विश्वजित कदम, पक्षप्रवक्ते सचिन सांवत, आ. बसवराज पाटील, विशाल पाटील,  पृथ्वीराज पाटील,  माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, पी. एम. पाटील, बाबासाहेब कोडक,   अभिजित चव्हाण आदी  उपस्थित होते.

मेळाव्यास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. तर व्यासपीठावर राज्यातील काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात सर्वच नेत्यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. जतच्या पूर्व भागातील म्हैसाळ योजनेपासून वंचित राहिलेल्या गावासाठी कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी काँग्रेसचा आमदार निवडून द्या. शेजारच्या कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. कर्नाटकचे नेते मल्लीकार्जुन खारगे हे महाराष्ट्र प्रभारी आहेत. त्यांना सोबत घेऊन तुबची- बबलेश्वर योजना मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेऊ,  असे खा. चव्हाण म्हणाले. त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला.  ते म्हणाले,  सरकार झोपेचे सोंग घेत आहे. आम्ही या सरकारच्या कामगिरीचा पर्दाफाश करित आहोत. ‘हम आगे बढेंगे, आप साथ रहेंगे’. शिवसेना आणि भाजपचे मंत्री रस्त्यांतील खड्ड्यांची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. आधा-आधा मिल-बाटके खायेंगे, असे त्यांचे सुरू आहे. त्यामुळे शिवसेनाही या कारभाराला भाजपइतकीच जबाबदार आहे. महाराष्ट्रावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यंदा पाऊस चांगला पडला असूनही पेट्रोल, डिझेलवर दुष्काळ अधिभार अजून घेतला जात आहे.

देशात सर्वाधिक पेट्रोल, डिझेलचा दर राज्यात आहे. सरकारकडे द्यायला पैसेच शिल्लक नाहीत. सरकार कसे चालवायचे असते, हे या लोकांना माहीत नाही. म्हणूनच आम्ही या सरकारला फसवणीस सरकार म्हणतो. शेतकर्‍यांना कर्जमाफी अजूनही मिळत नाही.  मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे 58 मोर्चे काढले. कुठेही गालबोट लागले नाही. आता लोकांची सहनशीलता संपली. प्रश्न स्फोटक होत आहेत, असे असताना सरकार तोंडाला गुळाचे बोट लावत आहे. मराठा समाजाला इतर समाजापासून तोडण्याचे काम करत आहे. आम्ही मराठा, मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला चालू करता येत नाही. 

 भाजपइतकीच शिवसेनासुद्धा जबाबदार आहे. भयमुक्त महाराष्ट्र आणि भाजपमुक्त भारत निर्माण करण्यासाठी 2019 मध्ये या सरकारचे सर्वांनी मिळून विसर्जन करू या. निवडणुका कधीही होऊ देत, काँग्रेस पक्ष निवडणुकीस तयार आहे, असे सांगत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2019 साली मोदींची देशात सत्ता येणार नाहीच.  परंतु पुन्हा मोदींना निवडून देण्याची चूक केली तर देशात,  लोकशाही व डॉ. आंबेडकर यांचे संविधान पहायलाही मिळणार नाही.