Fri, Apr 26, 2019 09:37होमपेज › Sangli › सहा ठिकाणी सशस्त्र दरोडा

सहा ठिकाणी सशस्त्र दरोडा

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 13 2018 12:32AMमालगाव : वार्ताहर

मिरज तालुक्यातील मालगाव परिसरातील तासगाव फाटा येथे रविवारी रात्री सहा ठिकाणी दरोडा पडला. यामध्ये मोबाईल, रोख रक्‍कम व सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून व डोळ्यांत चटणी टाकून ग्रामस्थांना मारहाण केली.एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. 

लंवद वस्ती, साईनाथनगर, डॉ. पाटील मळा, मगदूम मळा, इनामदार पोल्ट्री परिसरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. लवंद वस्तीवरील विकास दीपक लवंद यांच्या घरातील दोन तोळे सोने, मोबाईल व दहा हजार रुपये लंपास केले. दरवाजा व  तिजोरीची मोडतोड करून ग्रामस्थांना मारहाणही केली. साईनाथनगर येथील मल्लप्पा इरापा कवळी यांना मारहाण करून तसेच घरातील साहित्याची मोडतोड करून दहा हजार रुपये  लंपास केले.

 डॉ. पाटील मळ्यातील मजूर तानाजी बाबर यांचे दहा हजार रुपये व दुचाकी पळवून नेण्याच्या प्रयत्न केला. परंतु गाडीचे लॉक न निघाल्याने दरोडेखोर पळून गेले. मगदूम मळ्यातील बाबासो आप्पासो पाटील (वय 60) यांना डोळ्यात चटणी टाकून पाईपने बेदम मारहाण केली. तर इनामदार पोल्ट्रीमध्ये दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच इतरही ठिकाणी मोडतोडीचे प्रयत्न दरोडेखोरांनी केले.

या घटनेमध्ये दोघांना जोरदार मुक्का मार लागला आहे. चोरटे मराठी भाषा बोलत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालगाव परिसरात मोठ्या संख्येने चोरी होण्याची गेल्या सहा महिन्याती तिसरी घटना आहे.  पोलिसांनी रात्रीची  गस्त वाढवण्याची  मागणी नागरिकांतून केली जात आहे.