Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Sangli › आरवडे विषबाधा : रुग्णांचा आकडा वाढला 

आरवडे विषबाधा : रुग्णांचा आकडा वाढला 

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 12 2018 11:47PMमांजर्डे : वार्ताहर

आरवडे (ता. तासगाव) येथील एका खासगी लग्नसमारंभात मठ्ठा पिऊन विषबाधा झालेल्या रुग्णाची संख्या वाढली  आहे. आरवडेत  80 तर येळावी (ता.तासगाव) या गावात 50 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर आरवडे व येळावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. 

तासगाव येथील श्रीराम मंगल कार्यालयात आरवडे  व येळावी येथील कुटुंबियांचा लग्न सोहळा  बुधवार दि.9 मे रोजी  झाला. यावेळी जेवणासाठी असलेल्या पदार्थात मठ्ठा हा पदार्थ ठेवण्यात आला होता. हा मठ्ठा घेतल्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थानां उलटी, पोटदुखी, जुलाब याचा त्रास सुरू झाला होता. आरवडे येथील 80 व येळावी येथील 50 व इतर गावांतील 20  रुग्ण जादा आढळून आले आहेत. 

बाधा झालेले रुग्ण उपचारासाठी आरवडे येथे गेले असते दवाखाना बंद  होता. आरोग्य सेविकेस  मुक्कामी थांबण्याचे आदेश देऊन वैद्यकीय अधिकारी डी. बी.मस्के घरी निघून गेले. त्यानंतर आरोग्यसेविकाही रात्री निघून गेल्या. त्यामुळे रुग्णांची परिस्थिती बिघडली. आरोग्य सेविका  वेळेत आल्या नसल्यामुळे  आरोग्य केंद्राचे कुलूप तोडून काढले. अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर  या रुग्णांवर 11 वाजल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. 

दरम्यान, या प्रकारामुळे नातेवाईक आक्रमक झाले होते. घटनेस जबाबदार असलेल्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी रुग्णांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार सुमनताई पाटील यांनी रुग्णांची आरवडे येथे जाऊन भेट घेतली. त्यांनी सर्वांवर योग्य पद्धतीने उपचार देण्याबाबत सूचना दिल्या. आरवडे येथील अन्नातून विषबाधा प्रकरणात कामात हलगर्जी करणार्‍यांवर कडक कारवाई करणार आहे. या विवाहात अन्य गावातून आलेल्याची सुद्धा चौकशी करणार असल्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डी. आर.पाटील यांनी सांगितले.  श्रीराम मंगल कार्यालय  व तेथील केटरर यांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी अनिल पवार व  सतीश हाके यांनी सांगितले.