Wed, Jul 17, 2019 10:10होमपेज › Sangli › ‘स्वीकृत’ निवडीवरून भाजपसमोर धर्मसंकट 

‘स्वीकृत’ निवडीवरून भाजपसमोर धर्मसंकट 

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 07 2018 12:05AMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यपदावरून सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांत धुसफूस सुरू झाली आहे. यामध्ये भाजपमध्ये सर्वाधिक वाद उफाळून आला आहे. दिलीप सूर्यवंशी गटाने तर अशोक सूर्यवंशी यांना संधी न दिल्यास प्रसंगी उपमहापौरांसह प्रभाग 12 मधील सर्व सदस्याचे राजीनामे देऊ, असे नेत्यांना बजावले आहे.

मिरजेतूनही बाबासाहेब आळतेकर यांना संधी देण्यासाठी सुरेश आवटी गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांना संधी न दिल्यास राजीनामाअस्त्र उगारले आहे. त्यामुळे नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी स्वीकृत सदस्यपदाच्या पाच जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी-भाजप अशा 20 जणांनी कागदपत्रे नगरसचिव के. सी. हळिंगळे यांच्याकडे छाननीसाठी  सादर केली आहेत. यापैकी कोणाला स्वीकृतची लॉटरी लागते याचा फैसला 10 सप्टेबर रोजीच्या निवड महासभेत होणार आहे. 

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून इच्छुकांकडून अनेकजण इच्छुक होते. त्यासाठी नेत्यांकडे तगादा सुरू होता. परंतु पुढे होणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह पक्षातील बंड थोपवत इच्छुकांना संधी देण्याचे नेत्यांसोर आव्हान होते. त्यामुळे सर्वच इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी नेत्यांनी सांगितले. 

दरम्यान, त्यानुसार भाजपकडून तीन जागांसाठी सात जणांनी अर्ज भरले. यामध्ये भाजपचे नेते शेखर इनामदार यांचे नाव निश्चित मानले जातेे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेच्या कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपविल्याने इनामदार हे सभागृहात असतील. उर्वरित दोन जागांसाठी मोठी रस्सीखेच आहे. 

उर्वरित दोनपैकी मिरजेतून सुरेश खाडे गट आणि सांगलीतून खासदार संजय पाटील गटाला एक संधी अशी चर्चा आहे. खासदार गटाकडून रणजित सावर्डेकर यांची शिफारस केली आहे. परंतु दिलीप सूर्यवंशी गटाकडून उपहापौर धीरज सूर्यवंशी यांचे वडील अशोक सूर्यवंशी यांच्यासाठी आग्रह आहे. त्यांना संधी न दिल्यास निवड सभेतच उपमहापौरांसह प्रभाग 12 मधील त्यांचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील, असे नेत्यांना स्पष्ट बजावले आहे. 

दुसरीकडे मिरजेतून विवेक कांबळे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यामार्फत फिल्डिंग लावली आहे. ना. आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील आणि श्री. गाडगीळ यांनाही त्याबाबत ‘फोन’ केल्याचे समजते. दरम्यान, श्री. कांबळे यांनी संधी न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीला बंडखोरी करू, असाही पवित्रा जाहीर केला आहे.

त्यातच मिरजेतून भाजप नेते सुरेश आवटी यांनी 12 नगरसेवकांच्या गटामार्फत बाबासाहेब आळतेकर यांची शिफारस केली आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांना भेटून संधी न दिल्यास राजीनामाअस्त्र उगारले. एवढेच नव्हे तर तीन नगरसेवकांनी तर थेट राजीनाम्याची पत्रेही दिली. 

काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही एका जागेसाठी अनेक अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे प्रत्येकाला एकेक वर्ष संधी देण्याचा सूर आहे. परंतु पहिल्यांदा संधीसाठी प्रत्येकाने आटापिटा चालविला आहे. त्यात काँग्रेसमध्ये तीन गट असून त्यापैकी कोणत्या गटाला संधी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात सांगली की मिरज असा नवा वाद उफाळला आहे. त्यात मदनभाऊ युवा मंचानेही स्वीकृतवर हक्क सांगितला आहे. युवा मंचाचे शीतल लोंढे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांना भेटून जोर लावला  आहे. 

राष्ट्रवादीकडून या पाच जणांपैकी एकाची निवड होणार आहे. मिरजेतून नायकवडी व बागवान यांच्यात चुरस आहे. जमील बागवान यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी निवडणुकीवेळी शब्द दिला होता. तर सांगलीतून प्रा. पद्माकर जगदाळे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची, असा पेच आहे.

पक्षनिहाय स्वीकृत सदस्यत्वासाठी यांचे अर्ज 
भाजप : शेखर इनामदार, विवेक कांबळे, अशोक सूर्यवंशी, शरद नलावडे, मुन्ना कुरणे, बाबासाहेब आळतेकर, रणजित सावर्डेकर. (7 पैकी 3 जणांना संधी)
काँग्रेस : किशोर जामदार, करीम मेस्त्री, विजय पाटील, अजित दोरकर, अकबर मोमीन, कय्यूम पटवेगार, अर्जुन कांबळे, बिपीन कदम, शहाजी भोसले, ज्ञानदेव पवार. (एका जागेसाठी 10 इच्छुक) 
राष्ट्रवादी : इद्रिस नायकवडी, जमील बागवान, पद्माकर जगदाळे, आयुब बारगीर, सागर घोडके.

आयातांचा वरचष्मा अन् भाजप घायाळ

निवडणुकीत इनकमिंगमुळे भाजप निष्ठावंतांना उमेदवारीत संधी मिळाली नव्हती. आयातांचा वरचष्मा असल्याने भाजपमध्ये नाराजी होती. आता स्वीकृत सदस्य निवडीत निष्ठावंतांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. यामुळे संधी देताना ज्यांना उमेदवारी देऊन पराभूत झाले आहेत. यापूर्वी नगरसेवकपदासह विविध पदे भूषविली आहेत,  त्यांना संधी नको, असा पवित्रा घेतला होता. त्यासाठी नेत्यांनीही तशी भूमिका जाहीर केली. परंतु सर्व निकष धाब्यावर बसवत आयातांनी ब्लॅकमेल सुरू केले आहे.