Thu, Nov 15, 2018 11:37



होमपेज › Sangli › सांगलीत अप्पर तहसील कार्यालय मंजूर 

सांगलीत अप्पर तहसील कार्यालय मंजूर 

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 30 2018 12:06AM



सांगली : प्रतिनिधी

मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुका निर्मितीसाठी आमदार सुधीर गाडगीळ यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी   पहिल्या टप्यात अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला वित्तमंत्रालय आणि नियोजन विभागाची मंजुरी मिळाली  आहे. त्यामुळे  आता लवकरच  अप्पर तहसीलची घोषणा होऊन प्रत्यक्ष कामकाज सांगलीत सुरू होणार आहे.  दरम्यान सांगलीसाठी अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यावर सांगली शहर व परिसरातील गावे आणि मिरज पश्‍चिम भागातील  लोकांना फायदा होणार आहे. 

सध्याचा मिरज तालुका हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूपच मोठा आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार शहरी भागाची लोकसंख्या 5 लाख 28 हजार 627  तर ग्रामीण भागाची लोकसंख्या 3 लाख 25 हजार 954 आहे. गेल्या सहा वर्षांत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकसंख्या वाढत असल्याने कामाचा ताण मिरज तहसील कार्यालयवर वाढतो आहे. त्याशिवाय तालुक्याच्या पश्‍चिम भागात राहणार्‍या लोकांना कार्यालयाच्या ठिकाणी येण्यासाठी अंतर जास्त आहे. सावळवाडीपासून मिरज हे 35 किलोमीटर अंतरावर आहे. मिरज तालुक्याचा पश्चिम भाग हा सध्या वाळवा, सांगली आणि मिरज अशा तीन विधानसभा मतदार संघात समाविष्ट आहे.

त्यामुळे स्वतंत्र तालुका करण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्यासाठी आमदार गाडगीळ यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे.  जत तालुक्याचे विभाजन करून संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले .  त्याच पद्धतीने पहिल्या टप्यात अप्पर तहसील कार्यालय सांगलीतील  जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात  सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला   आहे. नियोजित तालुक्यात सांगली, कसबे डिग्रज आणि बुधगाव या तीन मंडलांमधील 26 गावांचा समावेश आहे. यापैकी चार गावे महापालिका क्षेत्रात तर बाकी 22 गावे ग्रामपंचायती हद्दीत आहेत. सांगली, अंकली, इनामधामणी, सांगलीवाडी, हरिपूर, कर्नाळ, पद्ममाळे, कसबेडिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, तुंग, दुधगाव, सावळवाडी, कवठेपिरान, मोळा कुंभोज, शेरीकवठे, बुधगाव, कुपवाड, वॉन्लेसवाडी, बामणोली, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी आणि माधवनगर या गावांचा यात समावेश आहे.

अप्पर तहसील कार्यालयामध्ये निवाशी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार, निवडणूक नायब तहसिलदार आणि संगयो नायब तहसीलदार असे चार अधिकारी, अव्वल कारकून 3, लिपीक 10, शिपाई 5 वाहनचालक 1 असे  19 कर्मचारी असणार आहेत. या प्रस्तावास मंत्रालयातील वित्त आणि नियोजन विभागात नुक्तीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सांगली अप्पर तहसिलची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.  सांगलीस स्वतंत्र तालुका आणि सुविधा देल्या गेल्यास  पश्‍चिम भागातील लोकांचा त्रास कमी होणार असून त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.   

अप्पर  तहसीलमुळे नागरिकांची सोय : आ. गाडगीळ

सांगली स्वतंत्र तालुका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्यात अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव आहे. त्याला वित्त आणि नियोजन विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव  लवकरच प्रत्यक्षात येईल.त्यामुळे सांगली आणि मिरज पश्‍चिम भागातील नागरिकांची सोय होणार आहे, असे आमदार  गाडगीळ यांनी सांगितले.