Mon, Mar 25, 2019 04:57
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › सांगली बसस्थानक नूतनीकरणाला मंजुरी

सांगली बसस्थानक नूतनीकरणाला मंजुरी

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 10:43PMसांगली : प्रतिनिधी

येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिली. यासंदर्भात 1.38 कोटी रुपयांचा प्रस्तावही मंजूर केल्याचे रावते यांनी सांगितल्याची माहिती शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने यांनी  दिली. 

बसस्थानक नूतनीकरण आणि माधवनगर डेपोच्या जागेवर शहरी बसस्थानक करण्यासंदर्भात श्री. रावते यांना माने यांनी प्रस्ताव दिला. पंधरा दिवसांत यासंदर्भात निविदा प्रक्रिया होणार असल्याचे माने म्हणाले.

ते म्हणाले, सांगली बसस्थानकाची अवस्था बिकट आहे. गेल्या दोन महिन्यात केवळ गर्दीमुळे या बसस्थानकावर दोन बळी गेले आहेत. रोज या आगारातून 1300 बसेस ये-जा करतात. प्रचंड गर्दीमुळे प्लॅटफॉर्म अपुरे पडतात. या बसस्थानकाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव वर्षानुवर्षे रखडल्याचे रावते यांच्या निदर्शनास आणून दिले. या कामासाठी आमदार अनिल बाबर, शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. 

माने म्हणाले, माधवनगर येथील 10 एकर जागेवर शहरी बस डेपो सुरू करावा, अशी मागणी आहे. कर्नाटक आणि कोकण विभागाच्या  गाड्याही माधवनगर डेपोमध्ये मुक्कामी ठेवाव्यात. चार प्लॅटफॉर्म  त्यासोबत गाळे, उपहारगृह, नियंत्रक केबीन असा दोन कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. परिवहन विभागाचे माजी उपाध्यक्ष दीपक राऊत यांनीही त्याला  मान्यता दिली होती. पण त्यानंतर हे काम रखडले आहे. या खर्चाची रक्कम एस.टी.महामंडळाच्या निधीतून करावी, अशी मागणी ना. रावते यांच्याकडे केली. त्यांनी याबाबत लवकर निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले आहे.