Tue, Aug 20, 2019 04:20होमपेज › Sangli › राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागू

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागू

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 7:49PMसांगली : प्रतिनिधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्तगत फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू न शकणार्‍या शेतकर्‍यांसाठी शासनाने नवीन फळबाग लागवड योजना लागू केली आहे. या वर्षासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

‘रोहयो’ अंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकर्‍यांना अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र जॉबकार्डधारक नसलेल्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नव्हता. अशा शेतकर्‍यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस होता. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नवीन फळबाग योजना लागू करण्यासंदर्भात सुतोवाच केले होते. त्यानुसार नवीन फळबाग योजना लागू करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर लागवडीसाठी शासन अर्थसहाय्य करणार आहे. याशिवाय  वृक्ष आधारित फळपिकांचा समावेश करण्याचे अधिकार कृषी विभागास देण्यात आले.

145 बाजार समित्या ‘ई-नाम’ पोर्टलशी जोडणार

सदाभाऊ खोत म्हणाले, शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्यासह बाजार समित्यांच्या कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) पोर्टलशी जोडण्याचा निर्णय झाला आहे. राज्यातील 85 बाजार समित्यांमध्ये यापूर्वीच ‘ई-लिलाव’ योजना सुरू झाली आहे. संगणकीय प्रणालीचा वापर करून शेतीमालाच्या आवकेची नोंद, वजन, लिलाव प्रक्रिया, शेतकरी तसेच अन्य घटकांना द्यावयाच्या रकमेची बिले तयार करणे, शेतमाल जावकची नोंद व शेतकर्‍यांना ई-पेमेंट सुविधेचा समावेश आहे.