Sun, Apr 21, 2019 04:44होमपेज › Sangli › भाजपला सत्ता दिल्यास सांगलीवर करवाढीचा बोजा

भाजपला सत्ता दिल्यास सांगलीवर करवाढीचा बोजा

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:22PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात दिल्यास नागरिकांवर करवाढीचा मोठा बोजा लादला जाईल. त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजीत कदम यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीचे प्रभाग 16 मधील उमेदवार पुष्पलता पाटील, उत्तम साखळकर, रुपाली चव्हाण, हारुण शिकलगार यांच्या प्रचारार्थ  आयोजित रॅलीत ते बोलत होते. आमदार कदम  म्हणाले,  सांगलीचा आतापर्यंतचा विकास हा काँग्रेस, राष्ट्रवादीमुळेच झाला आहे. तसेच यापुढेही काँग्रेस, राष्ट्रवादी हेच पक्ष विकास करू शकतात. विरोधकांना सरकार चालविण्याचा अनुभव नाही. त्यामुळे विरोधकांकडून  केवळ भूलथापा मारणे सुरू  आहे. सत्ता  मिळवण्यासाठी  त्यांची धडपड सुरू आहे. मात्र या थापांना जनता आता भूलणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचा फटका सर्वांनाच बसला आहे. या धक्क्यातून लोक अद्यापही सावरले नाहीत. त्यामुळे त्यांना निवडून देण्याची चूक मतदार करणार नाहीत. 

पुष्पलता  पाटील  म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत प्रभागात अनेक विकास कामे  केली आहेत. रस्ते, गटारी, ड्रेनेजच्या समस्या सोडविण्याबरोबर महिलांना शिलाई मशीन वाटप, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण, खुल्या व्यायामशाळा, शाळांमध्ये ई-लर्निंग आदि कोट्यवधींची  विकासकामे केली आहेत. त्यामुळे जनता यावेळी सुद्धा आमच्या मागे राहणार आहे. विरोधकांच्या भूलथापांना कोणीही फसणार नाही. जनतेचा पाठिंबा आम्हालाच आहे. 

काँग्रेसचे  उमेदवार उत्तम साखळकर  म्हणाले, प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले. मात्र  गेल्या चार वषार्ंत  केंद्र आणि राज्य सरकारने सांगलीची अडवणूक केली.  विकास करीत असताना आडकाठी आणली.  तरीसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. मतदारांनी याचा विचार करून सामान्यांच्या हाकेला सतत धावून जाणार्‍या काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करुन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.