Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Sangli › ‘कडेगाव-पलूस’च्या विकासाच्या गतीची चिंता

‘कडेगाव-पलूस’च्या विकासाच्या गतीची चिंता

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 22 2018 8:50PMकडेगाव : रजाअली पिरजादे 

कडेगाव - पलूस मतदारसंघ म्हटले की, ओघानेच डॉ. पतंगराव कदम यांचा नामोल्लेख केला जातो. डॉ. कदम आणि कडेगाव-पलूस मतदारसंघ यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्यामुळेच या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. मतदारसंघाच्या विकासाचे काय होणार, अशी लोकांना चिंता आहे. क्षणाक्षणाला सर्वपक्षीय नेत्यांना आता डॉ. कदम यांची आठवण होत राहणार आहे. सिंचन योजनांच्या  आवर्तनाचा विषय पुढे आला, की शेतकर्‍यांना त्यांची आवर्जून आठवण येते. त्यांनी  आघाडी सरकारच्या काळात

सिंचन योजना अखंडपणे कार्यान्वित रहाव्यात म्हणून प्रयत्न केले. सरकारी तिजोरीतून पैसे भरून ही योजना सुरू ठेवली.दुष्काळ, अतिवृष्टी किंवा सिंचन योजना असे प्रश्न  त्यांनी अतिशय गांभीर्याने आणि तेवढ्याच ताकतीने हाताळले होते. त्यासाठी पैसा कमी पडू दिला नाही. मतदारसंघातील छोट्या-मोठ्या कामांबरोबरच त्यांनी जिल्ह्यातील सर्वच विकासकामांना चालना दिली होती.विकासकामांच्या बाबतीत त्यांच्यासारखी दूरदृष्टी कोणाकडेही नव्हती. मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील विकासकामांच्या फाईल  घेऊन सचिवांपर्यंत जाणारे हे एकमेव मंत्री होते. मतदारसंघातील हजारो मुलांना त्यांनी नोकर्‍या लावल्या.कोट्यवधींची फी माफ केली.शिक्षणाची गंगोत्री गल्लीपासून दिल्ली पर्यंत नेली.

जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटना त्यांनी बळकट बनवली. कार्यकर्त्यांना ताकद दिली.  सहकाराला चालना दिली. अनेक मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी मंत्री म्हणून काम केले.  जिल्ह्याला त्यांनी गतवैभव प्राप्त करून दिले. राजकारणाचा वापर समाजकारणासाठी केला.राजकारणात त्यांच्या छत्र छायेखाली अनेक नेते उदयास आले.त्यांनी त्यांना पाठबळ दिले. त्यांनी लावलेल्या भारती विद्यापीठाच्या रोपट्याचा आजमितीस वटवृक्ष झाला आहे. मात्र त्यांच्या जाण्याने  विकासकामांना  खीळ बसेल की काय, अशी शंका वाटते आहे. मतदारसंघात तर  मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

Tags : Sangli, Sangli News, Anxiety, about Palus Kadegaon, development, Dr. Patangrao Kadam, Constituency