Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Sangli › आणखी शंभरजण होणार हद्दपार!

आणखी शंभरजण होणार हद्दपार!

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 7:40PMसांगली : अभिजित बसुगडे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाने आतापासूनच कारवाईला प्रारंभ केला आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आतापर्यंत 49 जणांना हद्दपार केले असून 13 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर चौघांना स्थानबध्द करण्यात आले आहे. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शंभराहून अधिक जणांना हद्दपार करण्याचे संकेत अधीक्षक शर्मा यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिले आहेत. 

अधीक्षक शर्मा म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल, ढाबे, परमीट रूम, वाईन शॉप यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जर एखाद्या हॉटेलमध्ये पार्टी असेल तर तिथे वाद होण्याची शक्यता  असते. त्यामुळे हॉटेलचालकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय नियमानुसार अधिकवेळ हॉटेल, बार सुरू ठेवल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. परमीट रूम, वाईन शॉप चालकांना नियमात राहूनच विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. नियम तोडल्याचे आढळल्यास कडक कारवाई होईल.महापालिका क्षेत्रातील गुंडांवर हद्दपारी, मोक्का, स्थानबध्दता अशा कारवाया केल्या आहेत. त्याशिवाय अवैध व्यावसायिकांवरही हद्दपारीचा बडगा उगारण्यात आला आहे. निवडणुकी दरम्यान कायदा हातात घेणार्‍यांवर कडक  कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही अधीक्षक शर्मा यांनी दिला आहे. 

दिवसभर नाकाबंदी

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हत्यारे, दारू, पैशांची वाहतूक याला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका क्षेत्रात दिवसभर नाकाबंदी करण्यात येत आहे. तीनही शहरात मिळून 12 ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात येत आहे. यावेळी वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. शहराबाहेरील गुंड  इथे येऊन गुन्हे करू नयेत यासाठी त्यांच्यावरही वॉच ठेवण्यात आल्याचे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

जिल्ह्यातील टोळीयुध्द आले संपुष्टात...

अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कार्यभार घेतल्यापासून गुन्हेगारी टोळ्यांना टार्गेट केले आहे. त्यामुळेच त्यांनी मटका बुकी, जुगारी, वाळू तस्कर यांच्यासह गुन्हेगारांवर हद्दपारी, मोक्का, फाळकूट दादा, स्थानबध्द अशा कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. त्याशिवाय शस्त्र तस्करीवर अंकुश आणला. या कारवायांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला चांगलाच आळा बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहेच शिवाय टोळीयुध्दही संपुष्टात आल्याचे चित्र आहे. 

दीडशेहून अधिक शस्त्रे जमा...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. केवळ महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर आजूबाजूच्या शहरे, गावांतील शस्त्रधारकांनाही शस्त्रे जमा करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. दीडशेहून अधिक शस्त्रे आचारसंहिता काळात जमा होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलातर्फे सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी निर्भय रहावे, असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे.