Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Sangli › कर्जमाफीचा आणखी 2861 शेतकर्‍यांना लाभ

कर्जमाफीचा आणखी 2861 शेतकर्‍यांना लाभ

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 7:42PMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थींची आठवी ‘ग्रीनलिस्ट’ अखेर प्रसिध्द झाली आहे. जिल्ह्यात आणखी 2 हजार 861 शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ठरले आहेत. लाभाची रक्कम 5 कोटी 39 लाख 13 हजार 449 रुपये आहे. 69 शेतकरी ‘ओटीएस’ साठी पात्र ठरले आहेत. त्यांनी 23.84 लाख भरल्यास त्यांचे 46.48 लाख माफ होणार आहेत. आठवी ग्रीनलिस्ट महिन्याहून अधिक काळ रखडली होती. वंचित शेतकरी आणि जिल्हा बँकेचेही लक्ष आठव्या ग्रीनलिस्टकडे लागले होते. 

मिसमॅच व अनमॅच यादीतील त्रुटी दूर करून शेतकर्‍यांची नावे आठव्या ग्रीनलिस्टमध्ये अंतर्भूत होणार होती. शिवाय काही शेतकरी हे कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत, पण सात ग्रीनलिस्टमध्ये त्यांचा समावेश नाही. तेही आठव्या ‘ग्रीनलिस्ट’च्या प्रतीक्षेत होते. आठवी ग्रीनलिस्ट प्रसिध्द झाली आहे. कर्जमाफीसाठी 403 शेतकरी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीची रक्कम 1 कोटी 37 लाख 48 हजार 863 आहे. प्रोत्साहन अनुदानासाठी 2 हजार 458 शेतकरी पात्र ठरले असून अनुदानाची रक्कम 4 कोटी 1 लाख 64 हजार 586 रुपये आहे. 

‘ओटीएस’साठी 69 शेतकरी पात्र ठरले आहेत. दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरल्यास दीड लाखाचे कर्ज माफ होते. त्याअंतर्गत दीड लाखावरील कर्जाचे 23 लाख 84 हजार 251 रुपये भरल्यास 46 लाख 47 हजार 972 शेतकर्‍यांचे कर्ज माफ होणार आहे. ‘ओटीएस’मध्ये सहभाग घेण्यासाठी दि. 30 जून अंतिम मुदत आहे. संबंधित शेतकर्‍यांनी दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरून दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. सांगली जिल्हा बँकेचे काम अतिशय चांगले झाल्याचे गौरवोद‍्गार पालकमंत्री देशमुख यांनी काढल्याची माहितीही बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिली.