सांगली ः प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थींची सहावी ‘ग्रीनलिस्ट’ शासनाने प्रसिद्ध केली आहे. जिल्हा बँकेकडील 19 हजार 542 शेतकरी कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाच्या 35 कोटी लाभास पात्र ठरले आहेत. याशिवाय ओटीएससाठी पात्र 234 शेतकर्यांनी दीड लाखावरील थकबाकीचे 1.47 कोटी रुपये भरल्यास 2.33 कोटी रुपयांचे थकित कर्ज माफ होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (एकूण 6 ग्रीनलिस्ट) 1.33 लाख शेतकरी 298 कोटी रुपयांचे लाभार्थी ठरले आहेत. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)प्रकाश अष्टेकर यांनी ही माहिती दिली.
कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएसच्या चार ‘ग्रीनलिस्ट’ नंतर यलोलिस्ट, ‘मिसमॅच-1’, ‘मिसमॅच-2’ यादीतील 91 हजारावर शेतकर्यांच्या कर्जमाफी माहितीच्या पडताळणीनंतर पात्र शेतकर्यांच्या ‘पाचव्या ग्रीनलिस्ट’ मध्ये 4 हजार 344 शेतकर्यांचा समावेश झाला. 6.50 कोटी लाभास पात्र ठरले.
‘प्रोत्साहन’मध्ये वाळवा पुढे
सहावी ‘ग्रीनलिस्ट’ प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये 19 हजार 308 शेतकर्यांचा समावेश आहे. त्यापैकी 1467 शेतकर्यांचे 5.73 कोटी कर्ज माफ झाले आहे. कर्जपुनर्गठन केलेल्या खानापूर तालुक्यातील 2 शेतकर्यांना 15 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. 17 हजार 841 शेतकरी 29.14 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरले आहेत. त्यापैकी एकट्या वाळवा तालुक्यातील 6 हजार 404 शेतकरी 10.30 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरले आहेत.
1.47 कोटी भरा 2.33 कोटी माफ
सहाव्या ग्रीनलिस्टमध्ये 234 शेतकरी ओटीएससाठी पात्र ठरले आहेत. त्यांनी दि. 31 मार्च 2018 पर्यंत दीडलाखावरील थकबाकीची रक्कम भरल्यास दीड लाखाची थकित रक्कम माफ होणार आहे. त्यानुसार या शेतकर्यांनी 1.47 कोटी भरल्यास त्यांचे 2.33 कोटी रुपये माफ होणार आहेत.
188 कोटी रुपये वर्ग; आणखी 41 कोटी लवकरच खात्यावर
ग्रीनलिस्ट 5 व ग्रीनलिस्ट 6 मधील कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाची रक्कम 41.42 कोटी रुपये आहे. यापैकी प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग होईल, तर कर्जमाफीची रक्कम विकास सोसायटींच्या खात्याला वर्ग होईल व कर्जखाते निल होईल.
64 हजार शेतकरी अपात्र
दरम्यान ऑनलाईन नोंदणी केलेले जिल्ह्यातील सुमारे 63 हजार 666 शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानास अपात्र ठरले आहेत.