Thu, Jul 18, 2019 21:25होमपेज › Sangli › आणखी 146 पोलिसांच्या बदल्या

आणखी 146 पोलिसांच्या बदल्या

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 10:16PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस दलातील जिल्हांतर्गत बदल्यांचा दुसरा टप्पा शनिवारी पूर्ण झाला. प्रशासकीय तसेच विनंतीनुसार 146 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी देण्यात आले. यापूर्वी 17 मे रोजी 285 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. बदल्यांच्या गॅझेटचे काम पूर्ण झाले असून आजअखेर 431 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस दलात दरवर्षी एप्रिल ते मेदरम्यान पोलिस शिपाई ते सहाय्यक उपनिरीक्षक यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय तसेच विनंतीनुसार बदल्या केल्या जातात. पोलिस ठाण्यात सहा वर्षे तसेच उपविभागात बारा वर्षे सेवा बजावलेल्या पोलिसांची यादी बनवून त्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्याशिवाय मुलांच्या शैक्षणिक अडचणी, पालकांचे आजार त्याशिवाय महत्वाच्या कारणांसाठी विनंतीनुसारही बदल्या केल्या जातात. 

यावर्षी पहिल्या टप्प्यात 285 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक 21, हवालदार 54, नाईक 33 व शिपाई 77 यांचा समावेश होता. गॅझेटचा दुसरा टप्पा शनिवारी पार पडला. यामध्ये 146 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक 18, हवालदार 30, नाईक 41, शिपाई 57 यांचा समावेश आहे. 

सहाजणांना मुदतवाढ

यामध्ये सहाजणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये गुंडा विरोधी पथकाकडील तिघे, तर कडेगाव, उमदी, मुख्यालयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

अधिकार्‍यांच्या बदल्यांची उत्सुकता...

जिल्हा पोलिस दलाकडील पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या गॅझेटचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये नाराज झालेल्यांना पुरवणी गॅझेटचे वेध लागले आहे. मात्र संपूर्ण पोलिस दलात आता अधिकार्‍यांच्या बदल्यांची उत्सुकता लागून राहिली आहे. नुकत्याच राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये चार निरीक्षक जिल्ह्यात नव्याने आले आहेत तर एक निरीक्षकाची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. नव्याने अधिकारी आल्याने आता जिल्ह्यातील पोलिस ठाणे प्रभारींच्या खांदेपालटाची उत्सुकता आहे. यामध्ये अकार्यक्षम अधिकार्‍यांना अकार्यकारी पदावर नेमणूक मिळण्याची शक्यता आहे.