Wed, Apr 24, 2019 22:12होमपेज › Sangli › अण्णासाहेब पाटील यांच्यावर दोषारोप सिद्ध

अण्णासाहेब पाटील यांच्यावर दोषारोप सिद्ध

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 13 2017 12:10AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अण्णासाहेब पाटील जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व जिल्हा परिषदेचे निलंबित कनिष्ठ लेखाधिकारी अण्णासाहेब पाटील यांच्यावर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने दोषारोप सिद्ध केले आहेत. दोषारोपाच्या अनुषंगाने कारवाईचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. 

जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषदेत अण्णासाहेब पाटील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था सुरू केली होती. बल्लाळेश्‍वर पतसंस्थेचे कारभारीही तेच होते. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेतील 2.25 कोटी रुपयांच्या ठेवी त्यांनी बल्लाळेश्‍वर पतसंस्थेत ठेवल्या होत्या. बल्लाळेश्‍वर पतसंस्थेतून जिल्हा परिषद मुद्रणालय व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या नावावर कर्ज उचलल्याचा प्रकारही घडला होता.ठेवीच्या रकमा मिळत नसल्याने  व बोगस कर्जे उचलल्याने ठेवीदारांनी पाटील यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पाटील यांना अटक झाली होती. न्यायालयीन कोठडी दिली होती. सध्या ते जामिनावर आहेत.  

दरम्यान, जिल्हा परिषदेची परवानगी न घेता संस्था स्थापन करणे, जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची फसवणूक, त्याद्वारे जिल्हा परिषदेची झालेली बदनामी, कर्तव्यात कसूर यावरून जिल्हा परिषदेने पाटील यांना तीन वर्षांपूर्वी निलंबित केले होते. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (चौकशी) यांच्याकडून याप्रकरणी चौकशी सुरू होती. अखेर ही चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशीत पाटील यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाले आहेत. 

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. दोषारोप सिद्ध झाल्याने कारवाई अटळ आहे. कारवाईसंदर्भात लेखाविभागाकडून फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाईल. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करतील.