Wed, Apr 24, 2019 01:29होमपेज › Sangli › क्रांतिवीर नागनाथअण्णा अष्टपैलू नेते

क्रांतिवीर नागनाथअण्णा अष्टपैलू नेते

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 22 2018 11:56PMवाळवा : प्रतिनिधी

क्रांतीवीर नागनाथअण्णांनी स्वातंत्र्यानंतर रचनात्मक कार्य करताना सहकाराचा पर्याय निवडला. सत्ताधार्‍यांच्या विरोधात राहून वंचित समाजासाठी वेगळा इतिहास निर्माण केला. ते अष्टपैलू नेते होते, असे गौरवोद‍्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी गुरुवारी येथे  काढले.पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सहाव्या स्मृतीदिन कार्यक्रमात डॉ. मोरे बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. विकास  आमटे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर नागनाथअण्णा समाधीस्थळ क्रांतिसिंह नाना पाटील आणि हुतात्मा किसन अहिर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहण्यात आले.

डॉ. मोरे म्हणाले, अण्णांचा विचार हा देशभरातील पुरोगामी चळवळींना आधार देणारा होता. भांडवलशाहीच्या विरोधात लढताना त्यांनी सहकार शस्त्राचा वापर केला. संपूर्ण महाराष्ट्र हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. डॉ.  आमटे म्हणाले, डॉ. बाबा आमटे आणि  क्रांतिवीर नागनाथअण्णा यांचे कार्य यामध्ये साम्य आहे. त्यांनी समाज हेच घर मानले. अजूनही सरकारचे उपेक्षितांकडे लक्ष पोहोचलेले  नाही. 
कुसुमताई नायकवडी म्हणाल्या, नायकवडी यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आजसुद्धा आपण नव्या संघर्षाला तयार झाले पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही. मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची तयारी करावी लागेल.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, देशाचे नेतृत्व करायची ताकद महाराष्ट्रात आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कोट्यावधींचे घोटाळे करून देश सोडून अनेकजण पळून जात आहेत. सरकारचे त्याकडे लक्ष नाही. नेमके कोणाचे संरक्षण केले जाते आहे तेच कळत नाही.हुतात्मा उद्योग समुहाचे प्रमुख वैभव नायकवडी म्हणाले, आजच्या युवा पिढीसमोर अण्णांचे कर्तृत्व हा मोठा आदर्श आहे. सर्वांनी संघटित ताकदीवर स्वराज्याचे सुराज्य करूया.

कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, प्रा.डॉ. बाबुराव गुरव, दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, सरपंच डॉ. शुभांगी माळी, वसंत वाजे, बाळासाहेब पाटील, अरुण यादव, डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, डॉ. सुरेश कदम, यशवंत बाबर, वंदना माने, डॉ. अशोक माळी, संजय अहीर, उमेश घोरपडे, मोहन सव्वाशे, सावकर कदम आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले.

Tags : Sangli, Sangli News, Annas thoughts, supportive of progressive movements, across the country