होमपेज › Sangli › शिक्षणाचे बाजारीकरण धोकादायक : अनिल पाटील

शिक्षणाचे बाजारीकरण धोकादायक : अनिल पाटील

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:10AM

बुकमार्क करा




सांगली : प्रतिनिधी

शिक्षण हा मूलभूत हक्‍क असताना त्याचे बाजारीकरण झालेले असून, बहुजन समाजासाठी धोकादायक असून ते रोखण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. 75 टक्के इंजिनिअर बिनकामाचे आहेत, 90 टक्के पदवीधरांना नोकरी नाही. 95 टक्के पीएच्डीधारक निरुपयोगी आहेत. त्यांच्या संशोधनाला महत्त्व नाही. दारूचे दुकान आणि शाळा एकच पद्धतीने चालवल्या जात आहेत. ही चुकीची शिक्षण पद्धती आपल्यावर थोपवली जात आहे. अशा काळात आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे गरजचे आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी व्यक्‍त केले. 

शांतिनिकेनच्या नवभारत शिक्षण मंडळ, प्राचार्य पी. बी. पाटील सोशल फोरम यांच्यावतीने रयत शिक्षण संस्थेला ‘कर्मयोगी’ पुरस्कार निवृत्त आयपीएस अधिकारी भगवंतराव मोरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. रयतच्यावतीने अध्यक्ष अनिल पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते. अनिल पाटील म्हणाले,   रयतला मिळालेला हा पुरस्कार 170 जातीच्या साडेचार लाख विद्यार्थ्यांचा आहे. संस्थेला 98 वर्षे पूर्ण झाली. कर्मवीरअण्णांनी रयतच्या माध्यमातून ब्राह्मणेत्तरांचे केंद्रच उभे केले होते. ते किंगमेकर होते. उद्योग, व्यवसायातून मिळालेल्या फायद्यातून 10 टक्के रक्‍कम शिक्षणासाठी बाजूला ठेवावा, असा कर्मवीरअण्णांचा आग्रह होता. परंतु ते पाळले गेले नाही. त्यामुळे कर्मवीरअण्णांनी किर्लोस्कर सोडून 1 विद्यार्थी व 36 रुपये भांडवलामध्ये रयतची स्थापना केली. आणि त्याचा आज वटवृक्षात रुपांतर झालेला आहे.  त्यामध्ये वैनींचेही योगदान खूप मोलाचे आहे. 

अडचणींच्या काळात महात्मा गांधींनी 500 रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर गोरगरीबापासून ते राजेराजवाडेपर्यंत सर्वांनी अण्णांना मदत केली. बहुजन समाज अण्णांच्या मागे उभा राहिला. त्यामुळे आजही गुगलवर दिसणार नाही, अशा गावात रयतची शाळा सुरू झालेली आहे. याबरोबरच संस्थेने बंधारे बांधले आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची मुले दत्तक घेतली आहेत. हे सर्व लोकसहभागातून सुरू आहे. 

यावेळी प्रमुख पाहुणे भगवंतराव मोरे म्हणाले, कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था आणि पी. बी. पाटील यांची नवभारत शिक्षण मंडळ ही समाजाचे स्फुलिंग पेटविण्याचे काम करीत आहेत. काम करणार्‍या माणसांना  विश्‍वास देण्याचे काम समाजाने केले पाहिजे. या संस्थांनी कधीही प्रसिद्धीचे भांडवल केले नाही. निरपेक्ष भावनेने त्या काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम समाजाने केले पाहिजे. 

यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार म्हणाले, रयत ही संस्था शाहू, फुलेंचे प्रोडक्ट आहे. स्त्रियांना समान दर्जा दिला जातो. रयत प्रमाणेच गरीब मुलांना मदत करण्याची भूमिका समाजाने घेतली पाहिजे. तरुणांना चांगले मार्ग दाखविले पाहिजे. त्यासाठी रयत व शांतिनिकेतनचा आदर्श घेण्याची गरज आहे. 

यावेळी शिक्षकेतर कर्मचारी शामराव जगताप व शिक्षक टी. डी. पाटील यांना माई पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जयसिंगराव पवार, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, रंगावलीकार संतोष ढेरे, माजी विद्यार्थी डॉ. हणमंतराव साळे आदींचा सत्कार करण्यात आला. आमदार सुमन पाटील, हुतात्मा उद्योग समुहाचे वैभव नायकवडी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक शिवाजीराव पवार, माधवराव माने, अरुण दांडेकर, सनतकुमार आरवाडे, गौतमीपुत्र कांबळे, समिता पाटील, उपसंचालक बी.आर.थोरात, डॉ. अविनाश पाटील, डॉ. मोहन पाटील,  एम. के. आंबोळे, विश्‍वनाथ गायकवाड,  ब्रिगेडियर सुरेश पाटील, अभिजित पाटील आदी उपस्थित होते. शौकत मुलाणी यांनी आभार मानले.