Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Sangli › सांगली : अनिकेतच्या अस्थी पोलिस मुख्यालयातच

सांगली : अनिकेतच्या अस्थी पोलिस मुख्यालयातच

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:35AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

संपूर्ण राज्यभर गाजलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणात आणखी एक बाब नव्याने उघडकीस आली आहे. आंबोलीतील कावळेसाद येथे सापडलेल्या अनिकेतच्या   अस्थी पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या ताब्यात त्या अस्थी आहेत. सुरुवातीला त्या ताब्यात घेण्याची तयारी दर्शविलेल्या कोथळे कुटुंबीयांनी मात्र आता त्या ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 

सहा नोव्हेंबरला चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना अटक केली होती. त्याचदिवशी रात्री निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या सहकार्‍यांनी दिलेल्या ‘थर्ड डिग्री’त अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी दहा ते अकरा या वेळेत कामटेसह अन्य संशयितांनी आंबोलीतील कावळेसाद येथे अनिकेतचा मृतदेह जाळला. त्यानंतर त्याची पूर्ण विल्हेवाट न लागल्याने डिझेल ओतून तो पुन्हा जाळण्यात आला.  अनिकेतचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना 8 नोव्हेंबरला उघडकीस आली. त्यानंतर सांगली पोलिसांनी कावळेसाद येथे जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह घेऊन ते परतत असताना कोथळे कुटुंबीयांनी अस्थी ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी परत घटनास्थळी जाऊन तेथील अस्थी आणल्या. मात्र नंतर मृतदेह असल्याचे समजल्यावर कोथळे कुटुंबियांनी अस्थी ताब्यात घेण्यास नकार दिला. 

त्यामुळे पोलिसांनी त्या अस्थी त्यांच्याच ताब्यात ठेवल्या आहेत. पोलिस मुख्यालयातील अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या कक्षात या अस्थी सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. आता कोथळे कुटुंबियांनी मृतदेहासोबतच त्या अस्थी ताब्यात घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांवर त्या अस्थी जपून ठेवण्याची वेळ आली आहे.