Sun, Feb 23, 2020 02:59होमपेज › Sangli › आणखी काही पोलिसांची होणार चौकशी

आणखी काही पोलिसांची होणार चौकशी

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:35PM

बुकमार्क करा

सांगली : अभिजित बसुगडे

अनिकेतवर कामटेसह त्याचे साथीदार थर्ड डिग्रीचा वापर करीत असताना ड्युटीवर नसणारेही काहीजण ठाण्याच्या परिसरात होते.  अनिकेतचा मृतदेह बाहेर नेल्यानंतरही ते परिसरात घुटमळत होते. अशांची चौकशी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर संबंधितांवर सीआयडीकडून कडक वॉच ठेवण्यात येत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 

वाटमारीप्रकरणी अनिकेत आणि अमोल भंडारेला दि. 5 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांचीही रवानगी पोलिस कोठडीत झाली. पोलिसांच्या नेहमीच्या सवयीनुसार कोणत्याही गुन्ह्यातील संशयिताकडे शक्यतो रात्री उशिरा चौकशी करण्यात येते. पोलिसी खाक्याची अधिक चर्चा होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. मात्र अनिकेतवर रात्री साडेसात ते आठच्या दरम्यानच थर्ड डिग्री वापरण्यास सुरुवात करण्यात आली. 

मुळात बेदम मारहाणीबद्दलच्या तक्रारी असणार्‍या युवराज कामटेला इतक्या लवकर अनिकेतवर थर्ड डिग्री वापरण्याचा सल्ला देणारे सध्या तरी बिनधास्त आहेत. अनिकेतचा खून झाल्याचे समजल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पोलिस ठाण्यात शुकशुकाट पसरला. मात्र ड्युटीवरील तसेच अन्य कर्मचारी ठाण्याच्या आजूबाजूला थांबून वातावरणाचा अंदाज घेत होते. अनेकजण तर सुटीवर असतानाही परिसरात घुटमळत होते. 

अनिकेतच्या खुनानंतर ठाण्याच्या परिसरात हालचाली टिपण्यासाठीच ते घुटमळत होते अशी चर्चा आहे. अनिकेतच्या खुनानंतर ड्युटीवर असणारे ठाणे अंमलदार, गार्ड, वायरलेस ऑपरेटर अशा सातजणांना निलंबित करण्यात आले आहे. तर अनिकेत आणि निलेश खत्रीच्या वादाची नोंद न केल्याने सहाय्यक फौजदार सुभाष कांबळे यांना दोन दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले. मात्र त्या ड्युटीवर असणारे पण पोलिस ठाण्यात हजर नव्हते अशा पोलिसांच्या चौकशीचे संकेत सीआयडीने दिले आहेत. त्याशिवाय ड्युटीवर नसतानाही पोलिस ठाण्याच्या आजूबाजूला घुटमळणारेही त्यांच्या रडारवर आहेत. एरवी अन्य गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी धडपडणारे त्यादिवशी मात्र अनिकेतच्या शोधासाठी प्रयत्न  करताना दिसून आले नाहीत.