Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Sangli › सांगली: सीआयडीचा तपास मुळापर्यंत जाणार का?

सांगली: सीआयडीचा तपास मुळापर्यंत जाणार का?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीआयडी करीत आहे. या पथकाने आतापर्यंत सर्व बाजूंनी तपास करीत अनेकांचे जबाब घेतले. मात्र एकाही आरोपीस अटक केलेली नाही. त्यामुळे सीआयडीचा तपास मुळापर्यंत जाणार का? अनिकेतचा खून नेमका कशासाठी करण्यात आला, याचा छडा लागणार का, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. तशी लोकांत चर्चा सुरू आहे. 

अनिकेतच्या खुनाला वीस दिवस झाले तरी नागरिकांच्या मनात आजही अनेक प्रश्‍न आहेत. अभियंता संतोष गायकवाड याची लुटमार झाल्यानंतर अनिकेत आणि साथीदार अमोल भंडारे यांना पोलिसांनी लगेच कसे पकडले.  त्यानंतर तपासाच्या नावाखाली अनिकेतचा मृत्यूहोईपर्यंत त्याला मारण्यात आले. एका बाजूला खुनासारखे गुन्हे केलेले बडे गुन्हेगार पोलिसांना दोन-दोन महिने सापडत नाहीत. मात्र दुसर्‍या बाजूला किरकोळ गुन्ह्यात संशयित आरोपीला त्याचा जीव जाईपर्यंत मारण्यात येते. त्यासाठी थर्ड डिग्रीचा वापर केला जातो. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. अनिकेतच्या कुटुंबियांनीही या सर्व प्रकाराबाबत संशय व्यक्त करून अनिकेतची सुपारी देऊन खून केल्याचा आरोप केला आहे.  

लकी बॅगचा मालक आणि मध्यस्थी करणाार व्यापारी यांची भूमिका या प्रकरणात नेमकी काय होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सहाजणांना अटक केली. त्यानंतर हा गुन्हा सीआयडीकडे देण्यात आला. 

त्यानंतर या पथकाने अनेक लोकांचे जबाब घेतले. मात्र आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. भंडारे याला नदी घाटावर रात्रभर धरून ठवलेले दोघे अद्याप फरारच आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. 

दुसर्‍या बाजूला कोथळे कुटुंबीयांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करीत न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी 4 डिसेंबरला होणार आहे. त्यात काय निर्णय होतो, याचीही उत्सुकता आहे.