सांगली : प्रतिनिधी
अनिकेत कोथळे याचा खून झालेल्या दिवशी गस्तीवर असलेल्या पोलिसांची चौकशी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यादिवशी शहर पोलिस ठाण्यात अनिकेत आणि अमोल भंडारे पळून गेल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यावरून ही चौकशी करण्यात येणार आहे. शिवाय कृष्णा नदीवर अमोलला धरून ठेवणार्या दोघांचा कॉल रेकॉर्डद्वारे शोध सुरू आहे.
पोलिस कोठडीत असणार्या अनिकेतला बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटेने थर्ड डिग्री दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच दिवशी रात्री कामटेने अनिकेत आणि अमोल कोठडीतून पळाल्याचे वरिष्ठ अधिकार्यांना कळविले होते. त्याशिवाय कामटेने स्वतः तशी नोंद स्टेशन डायरीत केली होती. त्यानंतर रात्री गस्तीवर असणार्यांनी काय केले याची चौकशी करण्यात येणार आहे.
दोघेही कोठडीत पळून गेल्यानंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. त्यातीलही काही पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे.