होमपेज › Sangli › युवराज कामटेसह संशयितांवर आज आरोप निश्‍चिती होणार

युवराज कामटेसह संशयितांवर आज आरोप निश्‍चिती होणार

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 11:18PMसांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडीने दि. 5 फेब्रुवारीला न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. याप्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम सोमवारी सांगलीत येत आहेत. याप्रकरणी सोमवारी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह संशयितांवर आरोपनिश्‍चिती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान कोथळे खून प्रकरणासह हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्याचीही सोमवारी सुनावणी होणार आहे.  

दि. 6 नोव्हेंबर रोजी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेत कोथळेवर थर्ड डिग्री वापरून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकऱणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर दि. 5 फेब्रुवारीला न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. 

मार्चमध्ये त्यावर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाकडे हा खटला वर्ग करण्यात आला आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. निकम यांची शासनाने नियुक्ती केली आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठीच ते सोमवारी सांगलीत येत आहेत. 

दरम्यान सोमवारी हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्याचीही सुनावणी होणार आहे. त्याही सुनावणी उपस्थित रहाणार असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. 

कोथळे खूनप्रकऱणी यापूर्वी दि. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीला ते उपस्थित होते. त्यावेळी पोलिस शिपाई राहुल शिंगटे, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी उपस्थित होते. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी दोघांचाही जामीन अर्ज फेटाळून लावला होता.