Mon, Jul 22, 2019 00:55होमपेज › Sangli › अनिकेत कोथळे याचा संगनमताने खूनच

अनिकेत कोथळे याचा संगनमताने खूनच

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 10:56PMसांगली : वार्ताहर 

अनिकेत कोथळेचा मृत्यू हा कोठडीतील मृत्यू नाही. तर, युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी संगनमताने कट रचून केलेला पूर्वनियोजित खूनच आहे, असा युक्‍तिवाद कोथळे खून प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी  बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर जामीन अर्जांवरील सुनावणीवेळी  केला.झीरो पोलिस झाकिर नबीलाल पट्टेवाले व जीपचालक राहुल शिंगटे या संशयितांनी जामिनासाठी अर्ज केलेले होते. या अर्जांवर बुधवारी सरकार व बचाव पक्षाचा युक्‍तिवाद पूर्ण झाला. सरकार पक्षाला जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी मदत केली. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. दीपक शिंदे, विकास पाटील व किरण शिरगुपे यांनी काम पाहिले. 

अ‍ॅड. निकम  म्हणाले,  हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.  बचाव पक्षाचे वकील साक्षीदारांच्या जबाबातील  त्रुटींचा आधार घेऊन जामीन मागत आहेत. या टप्प्यात तांत्रिक बाबींचा विचार न करता जामीन नामंजूर करावा. कारण, अमोल भंडारे, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह आठ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी  अनिकेतला अमानुष मारहाण केल्याचा जबाब तपासादरम्यान दिलेला आहे. प्रत्येक सशंयिताचा सहभाग त्यातून निष्पन्‍न होतो.  संशयितांना जामीन दिल्यास ते साक्षीदारावर दबाव व तपासात अडथळे आणू शकतात. संरक्षकच जर गुन्हेगारी करू लागले, तर सर्वसामान्यांनी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्‍न अ‍ॅड. निकम यांनी उपस्थित केला. 

बचाव पक्षाच्या कॉल डिटेल्स मागणी व कागदपत्रे मागणीच्या अर्जावर युक्‍तिवाद करताना अ‍ॅड. निकम म्हणाले, कॉल डिटेल्स हा तपासाचा भाग आहे. या डिटेल्सची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे ते डिटेल्स बचाव पक्षाला देण्यास सरकार पक्षाचा विरोध आहे. कागदपत्रे मागणी अर्जाबाबत त्यांनी सहमती दर्शवली. 

ते  म्हणाले,  तपासकामातील कागदपत्रांच्या  प्रती देण्यास सरकार पक्ष तयार आहे; परंतु तपास कामाशिवाय अन्य कागदपत्रे- उदाहरणार्थ, त्या काळातील स्टेशन डायरी, लॉकअप डायरी अशा स्वरूपाची कागदपत्रे देता येणार नाहीत. तपास कामातील मूळ कागदपत्रे सरकार पक्षाकडेच राहतील.बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड.  शिंदे म्हणाले,  झाकीर पट्टेवाला हा या गुन्ह्यामध्ये कोठेही सहभागी असल्याचे दिसत नाही. केवळ पोलिस अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून बेशुध्द  व नग्नावस्थेतील अनिकेतला कपडे घालण्यास त्याने मदत केली. तो काही गुन्हा होऊ शकत नाही. 

कामटे यांनी अनिकेतला  व अमोलला डीबी रूमला नेले. तेथे दोघांना प्रथम प्लॅस्टिक पाईपने पायावर व अंगावर मारहाण केली. नंतर त्यांचे कपडे काढले. अनिकेतच्या चेहर्‍यावर दोन मास्क लावले. त्यामुळे त्याला समोरचे दिसत नव्हते. नंतर त्याचे हात पाठीमागू बांधून दोरीच्या सहाय्याने उलटे लटकवले व खाली पाण्याची बादली ठेवली. त्याला मारहाण करीत दोरी वरखाली केली जात होती.थोड्या वेळात दोरी तुटल्याने तो पाण्यात पडला. त्याचा श्‍वास गुदमरल्याने तो बेशुध्द झाला. त्या अवस्थेत त्याला  बाजूला घेतले.  अमोलला त्याच्या छातीवर बसवून कृत्रिम श्‍वासोश्‍वास  देण्याचा प्रयत्न केला. अर्ध मृत अवस्थेत त्याला कापडात गुंडाळून पोलिस गाडीत घालून सांगली येथील एका खासगी रूग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तो मृत झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन सांगलीच्या स्मशानभूमीत गेले. 

गोंधळलेल्या अवस्थेत संशयितांनी एका तासाने तो मृतदेह एका खासगी वाहनातून आंबोली (जि. सिंधुर्दुग) येथे नेऊन जाळला. दुसर्‍या दिवशी अमोल व अनिकेत हे दोन्ही दोन्ही संशयित पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव करण्यात आला. तशी तक्रार स्वत: युवराज कामटे यांनी स्टेशन डायरीत नोंद केली होती. 

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे, हवालदार अनिल श्रीधर लाड, अरुण विजय टोणे,    नसरुद्दीन बाबालाल   मुल्ला, गाडीचालक राहुल शिवाजी शिंगटे,  यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल या पाच पोलिसांसह एकूण 11 जणांना निलंबित केले आहे. 

खटल्याची पार्श्‍वभूमी 

दि. 5 नोव्हेंबर 2017 रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना मोबाईल चोरीच्या संशयावरून अटक केली होती. न्यायालयाने त्या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दि. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे सांगली शहर पोलिस ठाण्यात आल्या व त्यांनी या चोरीच्या तपासाबाबत तपास अधिकारी युवराज कामटे यांच्याकडे चौकशी केली.