Thu, Apr 25, 2019 16:13होमपेज › Sangli › अनिकेत कोथळेचे कुटुंबीय आज पोलिसांना भेटणार

अनिकेत कोथळेचे कुटुंबीय आज पोलिसांना भेटणार

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 11:41PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

पुण्यातील फॉरेन्सिक न्याय सहाय्यक प्रयोगशाळेतील चाचणीनुसार तो मृतदेह अनिकेतचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता कोथळे कुटुंबीयांनी अस्थी ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, आज दिवसभरात पोलिसांनी त्याबाबत संपर्क साधला नसल्याचे त्यांनी सांगितले. तर कुटुंबीयांनी संपर्क साधल्यानंतर तातडीने सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून अस्थी ताब्यात देऊ, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगितले. 

चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा पोलिस कोठडीतच खून केला. त्यानंतर आंबोलीतील कावळेसाद येथे त्याचा मृतदेह दोनदा जाळून त्याची विल्हेवाट लावली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कामटेसह सहाजणांना अटक करण्यात आली. अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. 

त्यानंतर डीएनए चाचणीसाठी तो पुण्यातील  न्याय सहाय्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल मिळाला असून तो मृतदेह अनिकेतचाच असल्याचे सिद्ध झाल्याचे सीआयडीचे महासंचालक संजयकुमार यांनी सांगितले होते. दरम्यान, सोमवारीच कोथळे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांची भेट घेऊन डीएनए अहवाल आल्यानंतरच अस्थी ताब्यात घेणार असल्याचे सांगितले होते.