Mon, Mar 18, 2019 19:17होमपेज › Sangli › अनिकेत कोथळेचा मृत्यू शरीरांतर्गत रक्तस्त्रावानेच

अनिकेत कोथळेचा मृत्यू शरीरांतर्गत रक्तस्त्रावानेच

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 12 2018 10:28PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी पोलिस कोठडीत केलेल्या मारहाणीतच अनिकेतचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. छाती, पोटावर जाड, बोथट हत्याराने मारहाण झाल्याने त्याच्या शरिरांतर्गत रक्तस्त्राव झाला. यामध्ये फुफ्फुस, मूत्रपिंड, प्लीहामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. याला सीआयडीचे तपासाधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनीही दुजोरा दिला. 

दि. 6 नोव्हेंबरला रात्री  कामटे आणि त्याच्या साथीदारांनी पोलिस कोठडीत अनिकेतवर थर्ड डिग्रीचा वापर केला होता. त्यावेळी त्याला डीबी रूममध्ये उलटे टांगून मारण्यात आले होते. त्यामध्ये जाड आणि बोथट वस्तूने त्याच्या छाती आणि पोटावर जबर मारहाण करण्यात आली होती. ती  इतकी जबर होती की त्याच्या  फुफ्फुस, मूत्रपिंड, प्लीहा यामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाला. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागाने दिलेल्या अंतिम उत्तरीय चाचणीचा अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

त्याशिवाय हिस्ट्रोपॅथीच्या अहवालातूनही त्याचा मृत्यू जबर मारहाणीनंतर अंतर्गत रक्तस्त्रावाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी मृतदेहाच्या सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच तो कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यापूर्वीच सीआयडीकडे अंतिम उत्तरीय तपासणी अहवाल, हिस्ट्रोपॅथीचा तसेच डीएनए चाचणीचा अहवाल वैद्यकीय विभागाने दिला होता. या अहवालातील कारणांबाबत तपासाधिकारी कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीही अहवालात या बाबी नमूद असल्याला दुजोरा दिला. 

दरम्यान कोठडीतील मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर कामटेसह त्याच्या साथीदारांनी आंबोलीतील कावळेसाद येथे त्याचा मृतदेह नेऊन डिझेल टाकून दोनदा जाळला होता. तेथे अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर डीएनए चाचणीसाठी त्याचे नमुने पाठविण्यात आले होते. 

त्याशिवाय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले होते. तेथील अंतिम उत्तरीय तपासणीचा अहवाल येणे बाकी होते. तो अहवाल नुकताच सीआयडीला प्राप्त झाला आहे. 

याप्रकरणी यापूर्वीच  युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, गाडीचालक राहुल शिंगटे, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली आहे. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी, परिस्थितीजन्य, वैद्यकीय, तांत्रिक पुरावे सीआयडीच्या पथकाने जमा केले आहेत. त्याशिवाय आतापर्यंत 54 हून अधिक जणांचे जबाबही नोंदविले आहेत. 

सध्या या सर्व तपासात गोळा केलेले पुरावे सुसूत्रपणे लावण्याचे काम सुरू आहे. यामध्ये अनेकांना साक्षीदार करण्यात येणार आहे. त्याशिवाय अनिकेतचा मित्र अमोल भंडारेचाही वारंवार जबाब घेण्यात आला आहे.

डीव्हीआरचा अहवाल प्रलंबित
दरम्यान सांगली शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर कामटेने फोडला होता. त्याच्या चाचणीसाठी तो प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्यापही सीआयडीला प्राप्त झालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.