Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Sangli › घटनास्थळावरील पुरावे केले गोळा

घटनास्थळावरील पुरावे केले गोळा

Published On: Dec 20 2017 1:43AM | Last Updated: Dec 20 2017 12:08AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खून प्रकरणी पुढील तपासासाठी अधीक्षक श्रीकांत पाठक सांगलीत दाखल झाले आहेत. मंगळवारी दिवसभर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील ज्या ठिकाणी अनिकेतचा मृतदेह नेला तेथे प्रत्यक्ष जाऊन पुरावे गोळा करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान काही पोलिसांकडेही या घटनेबाबत चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

पोलिस कोठडीत असलेल्या अनिकेतला बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटेने थर्ड डिग्री दिली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच दिवशी रात्री कामटेने अनिकेत आणि अमोल कोठडीतून पळाल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविले होते. त्याशिवाय कामटेने स्वतः तशी नोंद स्टेशन डायरीत केली होती. त्यानंतर रात्री गस्तीवर असणार्‍यांनी काय केले याची चौकशी करण्यात येणार आहे. 

त्याशिवाय दोघेही कोठडीत पळून गेल्यानंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. त्यातीलही काही पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान अनिकेतचा मृतदेह पोलिस गाडीत घेऊन कामटे सांगलीत फिरत होता. त्यावेळी अमोलला घेऊन दोघेजण आयर्विन पुलावर थांबले होते. याबाबत मोबाईलच्या कॉल रेकॉर्डवरून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांचीही नावे निष्पन्न होतील असेही सूत्रांनी सांगितले. 

अनिकेतचा मृतदेह पोलिस ठाण्यातून बाहेर काढल्यानंतर तो जेथे-जेथे नेण्यात आला तेथे पाठक यांनी पथकासह जाऊन पाहणी केली. शिवाय तेथील काही पुरावेही गोळा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याबाबत सीआयडीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली.