Mon, Apr 22, 2019 06:27होमपेज › Sangli › कामटेचा न्यायालयात उद्दामपणा

कामटेचा न्यायालयात उद्दामपणा

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 11 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने सही, शिक्क्यानिशी आरोपपत्राची प्रत द्यावी, अशी मागणी सोमवारी न्यायालयाकडे सुनावणीच्या वेळी केली. कामटेला आधीच प्रत दिली असतानाही त्याने उद्दामपणे सही शिक्क्यानिशी प्रत मागितल्याने जिल्हा व सत्र न्या. सौ. एस. एस. सापटणेकर यांनी त्याला चांगलेच फटकारले. त्याच्या वकिलांनी याबाबत दिलेला अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला. यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम उपस्थित होते. 

अनिकेत कोथळे खून प्रकरणाबाबत सोमवारी न्या. सापटणेकर यांच्यासमोर सुनावणी झाली.  दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत कामटेसह त्याच्या साथीदारांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे कोथळेचा मृत्यू झाला होता. 

जबरी चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांना अटक करण्यात आली होती. त्यांना तीन दिवसांची कोठडी मिळाली होती. त्याच दिवशी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान  युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी कोठडीत चौकशी करताना अनिकेतला जबर मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. 

दाखल आरोेपपत्राच्या नक्कल प्रतीवर स्वाक्षरी आणि शिक्का देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी होणार होती. त्यासाठी त्याच्यासह अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनाही न्यायालयात आणले होते. 

न्यायालयात आणल्यानंतर कामटेने आरोपपत्राची आणि न्यायालयाकडे दाखल असलेल्या कागदपत्रांच्या प्रती मला सही शिक्क्यानिशी हव्या आहेत. त्या आरोपपत्रात बदल केला जाईल अशी शंका त्याने थेट न्यायाधीशांपुढे व्यक्त केली. त्यानंतर न्या. सापटणेकर यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. त्या म्हणाल्या, ‘तुम्हाला याअगोदरच आरोपपत्राची प्रत दिली आहे. तरीही तुम्ही शिक्क्यानिशी प्रत मागत आहात. यावरून तुम्ही न्यायव्यस्थेवर शंका उपस्थित केल्याचे वाटते’. त्यानंतर कामटे याला तातडीने न्यायालयाबाहेर नेण्याचे आदेशही न्या. सापटणेकर यांनी दिले.