Sun, Jul 05, 2020 23:17होमपेज › Sangli › आणखी दोन पोलिसांना अटक शक्य

आणखी दोन पोलिसांना अटक शक्य

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:59PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणाने नवीन वळण घेतले असून याप्रकरणी आणखी दोन पोलिस आणि एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक होण्याची शक्यता आहे. सीआयडीने याप्रकरणी कमालीची गुप्तता बाळगली असून चार दिवसात ही कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज सीआयडीच्या पथकाने अनिकेतचा मित्र अमोल भंडारे याच्याकडे सहा तास चौकशी केली आहे. त्यातून महत्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. 

कामटेसह त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा खून करून मृतदेह दोनदा जाळल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तातडीने हालचाली केल्या. त्यानंतर अमोलला पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्याने सांगितलेल्या घटनाक्रमावरून नंतर कामटेसह सहाजणांविरोधात खुनाचा तसेच पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी अमोलचा जबाब महत्वाचा ठरला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. 

सीआयडीने याप्रकरणी कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळेला अटक केली आहे. त्याच्याकडेही कसून चौकशी सुरू आहे. कामटेसह संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर सीआयडीने अन्य संशयितांवर वॉच ठेवला आहे. आज केलेल्या अमोलच्या चौकशीत अनेक महत्वाचे धागेदोरे सीआयडीच्या हाती लागले आहेत. 

त्यातून आणखी काही संशयितांची नावेही पुढे आली आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत दोन पोलिसांसह एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक होण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिस वर्तुळातदेखील जोरदार चर्चा असून या प्रकरणाच्या संबंधित पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.