Sat, Mar 23, 2019 16:47होमपेज › Sangli › प्रत्येकाच्या स्वतंत्र पुराव्यांची फाईल

प्रत्येकाच्या स्वतंत्र पुराव्यांची फाईल

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:10PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह अन्य सर्व संशयितांचा या गुन्ह्यात असलेल्या सहभागाच्या स्वतंत्र पुराव्यांची फाईल तयार करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी काही संशयितांना अटक होऊ शकते, अशी माहिती सीआयडीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी पत्रकारांना दिली.  

ते म्हणाले, आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेतला आहे. सर्व संशयितांविरोधात भक्कम पुरावे सीआयडीला मिळाले आहेत. त्याशिवाय मंगळवारी प्रत्यक्ष घटनास्थळांवर जाऊन पाहणी करण्यात आली आहे. यातील संशयित कोणत्याही परिस्थितीत सुटू नयेत यासाठी प्रत्येकाच्या गुन्ह्यातील सहभागाच्या पुराव्यांची स्वतंत्र फाईल तयार केली आहे. सीआयडीचा तपास वेगाने सुरू असून आणखी तांत्रिक पुराव्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. तेही लवकरच प्राप्त होतील, असेही पाठक यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, मंगळवारी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर त्याशिवाय कॉल डिटेल्समध्ये मिळालेल्या माहितीवरून अजूनही काही जणांकडे चौकशी सुरू आहे. त्यातून आणखी महत्वाची माहिती प्राप्त होत आहे. त्यामुळे यातील संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अनिकेतचा मृतदेह पोलिस ठाण्यातून बाहेर काढल्यानंतर तो जेथे-जेथे नेण्यात आला तेथे पाठक यांनी पथकासह जाऊन पाहणी केली. शिवाय तेथील काही पुरावेही गोळा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी घटनेबाबत भक्कम पुरावे मिळाल्याचेही समजते.