होमपेज › Sangli › आमचा तपास योग्य दिशेने सुरू

आमचा तपास योग्य दिशेने सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे प्रकरणाचा आमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणातील जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. यामधून कोणीही सुटणार नाही. त्यासाठी ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सीआयडीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

ते म्हणाले, माझे प्रशिक्षण झाल्यानंतर तातडीने येथे आलो आहे.  वरिष्ठांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार आमचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. भक्कम पुरावे गोळा करून 90 दिवसांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल.  कोथळे कुटुंबियांना आम्ही यापुढे तपासासाची माहिती देत जाऊ. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात येईल.

पाठक म्हणाले, अनिकेतचा डीएनए अहवाल अद्याप आलेला नाही. तो आमच्याही हातात नाही. त्याबाबत पुणे येथील प्रयोगशाळेत आमचा सतत संपर्क आहे. अनिकेतच्या खुनाचे नेमके कारण आताच सांगता येणार नाही. या प्रकरणाची माहिती मी घेत आहे. सीबीआयकडे तपास देण्याबाबत मी काही बोलू शकणार नाही. त्यांनी ही मागणी योग्य ठिकाणी मांडायला हवी. दरम्यान, पाठक यांनी सायंकाळी सीआयडीच्या अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला.