Wed, Nov 21, 2018 01:06होमपेज › Sangli › सांगली : कामटेच्या मामेसासर्‍यास अटक

सांगली : कामटेच्या मामेसासर्‍यास अटक

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 12 2017 2:09AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेतचा कोठडीत मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर कावळेसाद (आंबोली) येथे त्याचा मृतदेह जाळण्यात आला. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांचा यात सहभाग होता. दरम्यान, पोलिस ठाण्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कामटेच्या मामेसासर्‍याने मदत केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी त्याला सीआयडीने सोमवारी अटक केली. बाळासाहेब आप्पासाहेब कांबळे (वय 48, रा. सत्यविजय अपार्टमेंट, सांगली) असे त्याचे नाव आहे. 

अभियंत्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या प्रकरणात अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारी यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यादिवशी रात्री  युवराज कामटे याच्यासह त्याच्या साथीदारांनी कोठडीत मारहाण करून अनिकेतचा खून केला. त्यानंतर अनिकेतसह अमोलने पलायन केल्याचा बनावही केला.  

कामटेने अनिकेतचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह पोलिस गाडीतून बाहेर नेला. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने अनेकांना संपर्क साधला. त्यादिवशीच्या कामटेच्या कॉल डिटेल्सवरून अनेकांकडे सीआयडीने चौकशीही केली आहे. 

याप्रकरणी यापूर्वीच कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे,    नसरुद्दीन मुल्ला, गाडीचालक राहुल शिंगटे, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली आहे. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.