होमपेज › Sangli › कामटेकडून कॉल डिटेल्स, स्टेशन डायरीची मागणी 

कामटेकडून कॉल डिटेल्स, स्टेशन डायरीची मागणी 

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 27 2018 12:21AMसांगली : वार्ताहर

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपींनी कारागृहातून पत्र पाठवून त्यांचे फोनवरील कॉल डिटेल्स, पोलिस स्टेशनमधील लॉग बुक, लॉकअप रजिस्टर, सी. आर. रजिस्टर आदींची मागणी केली आहे. या मागणीवर दि. 11 मे पर्यंत सरकार पक्षाने म्हणणे मांडण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी गुरुवारी  दिले. 

न्यायाधीश सौ. सापटणेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची आज सुनावणी होती.  विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम , जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, तपास अधिकारी   उपस्थित 
होते.  

दि. 6 नोव्हेंबररोजी चोरीच्या संशयावरुन सांगली शहर पोलिस ठाण्यात  पोलिस कोठडीत असलेल्या अनिकेत कोथळे या युवकाला  निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहा पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. बेदम  मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. 

हा खून दडपण्यासाठी अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळण्यात आला. सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. अनिकेत व चोरीच्या गुन्ह्यातील त्याचा साथीदार पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव कामटे व त्याच्या साथीदारांनी केला  होता. राजकीय पक्ष व संघटनांनी याविरुध्द आवाज उठविल्यानंतर दुसर्‍या दिवशी या सहा पोलिसांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. उपनिरीक्षक  कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, पोलिस वाहन चालक राहुल शिंगटे, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले व युवराज कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. हे सर्वजण सध्या  कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. 

कारागृहातून  कामटे याने न्यायालयाला अनेक पत्रे लिहिली आहेत. त्यापैकी काही पत्रांवर त्याच्या अन्य साथीदारांच्या देखील सह्या आहेत.  यामध्ये त्याने गुन्हा घडला त्या दिवशीचे त्याच्या फोनवरील कॉल्सचे डिटेल्स, पोलिस ठाण्यामधील लॉगबुक, लॉकअप रजिस्टर व  गुन्हा नोंद रजिस्टर (स्टेशन डायरी)  यांची  मागणी केली आहे.  

Tags : sangli, sangli news, Aniket Koshale murder case,  Kamte, Call details, station diary demand,